> काँग्रेसचा प्रभाव असलेल्या राज्यात शेकाप हा प्रबळ विरोधी पक्ष होता.
> उध्दवराव, एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख आदी शेकाप नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
> उध्दवरावांच्या मागण्यांपुढे सरकार झुकले आणि रोजगार हमी योजनेचा जन्म झाला.
Bhai Uddhavrao Patil and 1966 Bailgadi Morcha
उमेश काळे, छत्रपती संभाजीनगर
चर्चा मुंबईत मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनाची आहे. मराठवाड्यातील आंदोलक ठरल्याप्रमाणे मुंबईत धडकले. अशाच प्रकारचे आंदोलन धाराशिवचे शेकाप नेते भाई उध्दवराव पाटील यांच्या पुढाकाराने झाले होते...ते होते बैलगाडी आंदोलन. जवळपास एक लाख बैलगाड्या शेतकर्यांच्या विविध मागण्यांची सरकारने दखल घ्यावी म्हणून मुंबईत पोहोचल्या होत्या. त्यामधील चाळीस हजार धाराशिव जिल्ह्यातील होत्या.
भाई हे प्रारंभी हैदराबाद स्टेट असेंब्ली, तसेच लोकसभेचेही सदस्य होते. पण त्यांचे मन खर्या अर्थाने दिल्लीत कधी रमले नाही. राज्यात परतल्यावर विधानसभेवर ते पुन्हा निवडून आले. काँग्रेसचा प्रभाव असलेल्या राज्यात शेकाप हा प्रबळ विरोधी पक्ष होता. उध्दवराव, एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख आदी शेकाप नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. मराठवाड्यातील परभणी व धाराशिव हे दोन जिल्हे, नांदेडातील कंधार परिसरावर शेकापचा त्या काळात वरचष्मा होता. हे तिन्ही नेते शेती व अन्य प्रश्नांसाठी विधानसभा आणि सभागृहाबाहेर रान उठवित असत. शेतकर्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले जात नाही, अशी तक्रार शेेकापची होती, त्यासाठी या पक्षाने बैलगाड्या घेत मुंबईत पोहचण्याचे ठरविले.
मंत्री देसाईंना अडविले
बैलगाडी मोर्चा कशाप्रकारे झाले याची फारच त्रोटक माहिती उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी 13 मार्च 1966 रोजी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. शिस्तीने हा मोर्चा मुंबईत पोहोचला. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे मोर्चाला सामोरे गेले. त्यांनी शेतकर्यांचे निवेदन स्विकारले. तेव्हा राज्याचे गृहमंत्री बाळासाहेब देसाई होते. ते आपल्या गाडीतून खाली उतरले. नमस्कार - चमत्कार झाल्यानंतर उध्दवराव त्यांना म्हणाले, साहेब तुम्हाला आज मुंबईत जाता येणार नाही. बाळासाहेबांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते परत आपल्या गाडीतून मेघदूत बंगल्यावर पोहचले. तेव्हा मंत्री वा आमदारांना आतासारखी सेक्युरिटी नव्हती. परस्परांबद्दल विश्वास व आपुलकीची भावना होती.
धाराशिवमध्ये लाठीमार 1972
1972 ला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. शेतमजुरांच्या हाताला काम नव्हते. केवळ मराठवाडाच नव्हे तर राज्याच्या अन्य भागातही दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे साहजिकच सरकारकडून अपेक्षा वाढल्या होत्या. शेतसारा माफ करा, कर्जाची वसुली करू नका अशा मागण्या शेतकरी, शेतमजुरांच्या होत्या. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 15 हजारांवर शेतमजुरांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला होता. यावेळी पुरवठा मंत्री भाऊसाहेब वर्तक यांची गाडी मोर्चेक-यांनी अडविली. साहाजिकच पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आला. विधानसभेत या लाठीमाराच्या विरोधात उध्दवरावांनी आवाज उठविला. अखेर उध्दवरावांच्या मागण्यांपुढे सरकार झुकले आणि रोजगार हमी योजनेचा जन्म झाला.
मुलगा गंभीर, तरीही मोर्चात..
14 डिसेंबर, 1963 ला उद्धवरावांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत शेकापने मोर्चा काढला होता. तेव्हा त्यांचा 11 वर्षांचा बाळासाहेब नावाचा मुलगा धाराशिव येथे टायफाइडने आजारी होता. त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करावे लागले. धाराशिवहून एका कार्यकर्त्याने ही माहिती तारेने त्यांना कळविली. पण ते मोर्चातून बाहेर पडले नाहीत. त्यांना पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर पोलिासांनी कामाचा भाग म्हणून कपड्यांची तपासणी केली, तेव्हा खिशात मुलगा गंभीर असल्याची तार सापडली. पोलिसांनाही काही कळेना. त्यांनी तातडीने उद्धवरावांना धाराशिवला पाठविले. दवाखान्यात मुलगा त्यांची वाट पहात रूग्णशय्येवर होता. त्याने आपल्या मुलाचा हात हातात घेतला आणि काही क्षणातच मुलाने डोळे मिटले. (संदर्भ : व. न. इंगळे यांनी भाई उद्धवराव पाटील यांच्यावर लिहिलेले चरित्र.)
मुख्यमंत्रीपदाची ऑफर
यशवंतराव चव्हाण यांचे केंद्रात जाणे नक्की झाल्यावर आपल्या जागेवर चांगल्या नेत्याची निवड व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्यापुढे नाव आले ते उद्धवरावांचे. त्यांनी बीडचे नेते रामराव आवरगावकर यांच्यामार्फत उद्धवरावांना निरोप पाठविला, पण त्यांनी ऑफर साफ धुडकावली. त्यासाठी त्यांना शेकाप सोडून काँग्रेसमध्ये जावे लागणार होते. ते आवरगावकरांना म्हणाले, तुम्ही देत असलेला सन्मान मी स्वीकारणार नाही. कारण मी डाव्या विचारांचा आहे. माझे पार्थिव शेकापच्या लाल झेंंड्यातच गुंडाळले जाणार आहे, मला सत्तेच मोह नाही.
तेव्हा धाराशिव आणि लातूर हे दोन जिल्ह्ये वेगवेगळे नव्हते. लातुरचा धाराशिवमध्येच अंतर्भाव होता. पण लातूर हे या धाराशिवच्या तुलनेने मोठे शहर. लातुरात काही जिल्ह्याची शासकीय कार्यालये असली तरी एसटीचे विभागीय कार्यालय असावे, अशी लातुरकरांची मागणी होती. या मागणीसाठी 1972 मध्ये मोठा मोर्चा लातुरात निघाला आणि त्या मोर्चावर गोळीबार झाला. मराठवाड्यात होऊ घातलेल्या विकास आंदोलनाची ती मुहुर्तमेढच होती.
मराठवाड्यातील आंदोलने या मालिकेतील पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा