Beware! Hajj pilgrims on the radar of cyber fraudsters
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा हज यात्रा-२०२७ साठी यात्रेकरूंना वैद्यकीय तपासणी, आरोग्य प्रमाणपत्रासह विविध कागदपत्रांसाठी हज समितीने अधिकृत लिंक उपलब्ध करुन दिली आहे. ही संधी सादत सायबर भामट्यांनी अनधिकृत लिंक सोशल मीडियावर टाकल्या आहेत. त्याद्वारे यात्रेकरूंचे बँक खाते रिकामे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सविस्तर तपासणी करूनच लिंकवर क्लिक करा, असे आवाहन महाराष्ट्र हज समितीचे लेखाधिकारी शेख, शोएब मुसा यांनी केले आहे.
सायबर भामटे कशा पद्धतीने नागरिकांची लूट करतील, हे सांगणे शक्य नाही. अगदी सहजपणे नागरिकांना भूरळ पाडून मोबाईलवरील दोन ते तीन मिनिटांच्या संभाषणाद्वारे लाखोंची लूट करीत बँक खाते क्षणात रिकामे करीत आहेत. सध्या अशीच लूट हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची होण्याची भीती राज्य हज समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
हज समितीने पुढील वर्षी होणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने यात्रेकरूंना विविध प्रमाणपत्रे, वैद्यकीय तपासणी व इतर प्रक्रियेसाठी अधिकृत लिंक उपलब्ध करून दिली आहे. परंतु, या लिंकप्रमाणेच सध्या सोशल मीडियावर इतरही अनधिकृत लिंक काही सायबर भामट्यांकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या सध्या सोशल मीडियावर सर्वत्र पसरल्या आहे. या अनधिकृत व बनावट लिंकपासून यात्रेकरूंनी सावध राहावे. शहानिशा करूनच प्रत्येकांनी लिंकवर क्लिक करावे, नसता फसवणूक होईल.
आरोग्य तपासणी सरकारी रुग्णालयातच
या लिंकद्वारे काहीजण यात्रेकरूंना आरोग्य तपासणी आणि त्याचे प्रमाणपत्रे हे उपलब्ध करून देण्याची थाप सोशल मीडियावर टाकतील. प्रत्यक्षात प्रत्येक तपासण्यांसाठी यात्रेकरूंना सरकारी रुग्णालयातच जावे लागणार आहे. त्यासाठी हज समितीकडून तारखा आणि वेळेची माहिती देखील यात्रेकरूंना दिली जाईल, कोणीही अशा अनधिकृत लिंकवर माहिती भरू नये, असे लेखाधिकारी शोएब मुसा शेख यांनी दिली