Betrayal; Woman beaten, jewellery stolen
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मैत्रीचे नाते प्रस्थापित करून आणि एकत्र राहण्याचा विश्वास देऊन एका भामट्याने ३५ वर्षीय महिलेला पट्टयाने बेदम मारहाण करत तिच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना एन-७ सिडको भागात घडली. मोहित भिकुलाल भंडारी (रा. प्लॉट नं. ३०/३१, हनुमान मंदिर परिसर, सिल्लोड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बुधवारी (दि.२२) सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, ती मार्केटिंगचा व्यवसाय करते. काही दिवसांपूर्वी सिल्लोड येथील मोहित भंडारी याच्याशी तिची ओळख होऊन मैत्री झाली होती. मोहितच्या सांगण्यावरूनच तिने १८ जून रोजी एन ७ सिडको येथे भाड्याने रूम घेतली होती. त्यानंतर हे दोघे चार ते पाच दिवस या रूमवर एकत्र राहत होते.
यादरम्यान तिच्या पेटीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने मोहितने पाहिले होते आणि त्याची नियत फिरली. २३ जून रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आरोपी मोहित भंडारी याने अचानक वाद घालण्यास सुरुवात केली. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तिला पट्ट्याने बेदम मारहाण केली. पेटीतील दागिने आणि रोख असा ऐवज घेऊन पोबारा केला. गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार मंगेश पवार करत आहेत.
भामट्याने लंपास केलेला ऐवज
सोन्याचा नेकलेस : १८ ग्रॅम, मंगळसूत्र : ६.५ ग्रॅम, सोन्याची चैन व पेंडल : ६.५ ग्रॅम, सोन्याचे कानातले : ५.१ ग्रॅम, लहान मुलीचे कानातले : ४.५ ग्रॅम, २ अंगठ्या आणि ४ ओम पेंडल असे सुमारे साडेचार तोळ्याचे दागिने, तसेच चांदीचे पैजण ४ जोड, जोडवी ६ जोड, कंबरचैन आणि लहान मुलांचे हाता-पायांचे कडे आणि पर्समधील २५ हजाराची रोख रक्कम.