Beer Bar News : बिअर बारचे रात्री १.३० वाजता 'शटर डाऊन' file photo
छत्रपती संभाजीनगर

Beer Bar News : बिअर बारचे रात्री १.३० वाजता 'शटर डाऊन'

शहरात रात्रीची धिंगामस्ती खपवून घेणार नाही; पोलिस आयुक्तांची कडक नियमावली

पुढारी वृत्तसेवा

Beer bar shutters down at 1.30 am

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील बिअर बार रात्री दीड (१.३०) वाजता बंद होतील, असा नियम उत्पादन शुल्क विभागाने कागदावर लिहून ठेवला आहे. मात्र वास्तवात या नियमाला केराची टोपली दाखवत अनेक बार 'शटर डाऊन' करून पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत राजरोसपणे सुरू असायचे. वाढत्या गुन्हेगारीला आणि रात्रीच्या वेळी चालणाऱ्या राड्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरातील सर्व बार, पब आणि रेस्टॉरंटसाठी शनिवारी (दि.४) कडक अधिसूचना जारी केली आहे. हे आदेश ६० दिवसांच्या कालावधीसाठी लागू असतील.

वर्दळीच्या जालना रोडवर एका व्यावसायिकाची चाकूने भोसकून झालेली निघृण हत्या आणि त्यानंतर सिडको एन-७ भागातील 'सुरभी बार' मधून पहाटे ४ वाजता बाहेर पडलेल्या दोन गटांमधील तुंबळ हाणामारी यासह काही घटनांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढले. अधिकृत वेळ रात्री १.३० ची असताना, पहाटे ४ वाजता बारमधून लोक बाहेर पडतातच कसे? हा खरा प्रश्न होता. शटर ओढून घ्यायचे आणि मागील दाराने 'व्हीआयपी' ग्राहकांना आत घेऊन पहाटेपर्यंत मद्यींचा धिंगाणा सुरू ठेवायचा, अशी 'मोडस ऑपरेंडी' अनेक बार चालकांनी अवलंबली आहे.

काय आहेत नवे कडक नियम ?

१) वेळेचे कठोर बंधन: शहरातील सर्व पब, बार आणि परमिट रूम रात्री १:३० वाजता काटेकोरपणे बंद करावे लागतील.

२) ऑर्डरची वेळ निश्चित: रात्री १ वाजेनंतर अन्न किंवा मद्याची कोणतीही नवी ऑर्डर घेता येणार नाही. ग्राहकांना आवारातून निघून जाण्यासाठी ३० मिनिटांची अधिकची सवलत दिली जाईल.

३) डीजे आणि संगीतावर नियंत्रण लॉन आणि मोकळ्या मैदानावरील डीजे तसेच संगीताचे कार्यक्रम रात्री १० वाजताच बंद करणे आवश्यक आहे. आस्थापनांना 'साऊंड प्रूफिंग' (ध्वनी रोधण) करणे बंधनकारक आहे.

४) वयाची अट व ओळखपत्र : १८ वर्षांखालील मुलांना परमिट रूममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. २५ वर्षांखालील तरुणांना मद्य देता येणार नाही. प्रवेशासाठी शासकीय ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वाहन परवाना) तपासणे अनिवार्य आहे.

५) बैठक रूममध्ये नाचण्यास मनाई : गटागटांतील भांडणे टाळण्यासाठी ग्राहकांना नाचण्यास सक्त मनाई असेल.

६) बाऊन्सरची चारित्र्य पडताळणी : सुरक्षारक्षक आणि बाऊन्सरची चात्र्यि पडताळणी अनिवार्य असून, मागील १० वर्षांत गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला परिमंडळीय पोलिस उपायुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय कामावर ठेवता येणार नाही.

७) सीसीटीव्हीची सक्ती ग्राहकांचा वावर असलेल्या सर्व जागांवर सीसीटीव्ही आणि तपासासाठी २ डीव्हीआर संच बसवून त्यातील १५ दिवसांचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवणे सक्तीचे आहे.

८) 'ड्रंक अँड ड्राईव्ह' वर नजर : मद्य प्राशन केलेले ग्राहक स्वतः वाहन चालवत नाहीत, याची खात्री करण्यासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती मालकांना करावी लागेल.

९) अंमली पदार्थ, ई-सिगारेटवर बंदी : बारच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ आणि ई-सिगारेट ओढण्यास किंवा विक्रीला पूर्णपणे बंदी असेल.

१०) पोलिसांना तातडीने माहिती बारमध्ये अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ ११२ वर डायल करून नियंत्रण कक्षाला माहिती देणे बंधनकारक राहील.

या अधिसूचनेतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बार, पब किंवा हॉटेल मालकांवर बीएनएस २०२३ चे कलम २२३ तसेच कृत्यानुरूप इतर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात येतील. या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे निर्देश गुन्हे शाखा आणि सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. शहरात रात्रीची धिंगामस्ती खपवून घेतली जाणार नाही.
- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT