Banking app hack: Cyber crooks defraud Rs 2 lakh
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बँकिंग व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाईल अॅपचा वापर करताना निष्काळजीपणाने टाकलेल्या चुकीच्या पीनचा फटका शहरातील एका व्यावसायिकाला बसला आहे. मोबाइलवर आलेल्या मिसकॉलनंतर हॅक झालेल्या मोबाइलवर ओटीपी पाठवून भामट्यांनी व्यावसायिकाला १ लाख ९७हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी रात्री सातारा परिसरात घडली.
रहीम मुसा शेख (३५, रा. शिगी, ता. गंगापूर) व्यावसायिक आहेत. ते व्यवहारासाठी एसबीआय बँकेच्या खात्याचा वापर करतात. १८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान, शेख हे चितेगाव येथून कार्यालयाकडे येत होते. त्या दरम्यान त्यांनी युनो एसबीआय अॅप उघडून लॉगिन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पासवर्ड विसरल्यामुळे त्यांनी पासवर्ड रिसेट केला. त्या वेळी खात्यात एनसीसी लिमिटेड या कंपनीने कामाचे १ लाख ९९ हजार ६३४ रुपये जमा केलेले दिसले.
एक कॉल अन् पैसे गायब थोड्याच वेळात त्यांच्या मोबाईलवर अनोळखी मोबाइल क्रमांकावरून मिसकॉल आला. शेख यांनी त्या क्रमांकावर कॉल केला. पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. काही मिनिटांतच त्यांच्या मोबाइलवर एसबीआयच्या नावे ओटीपी आला. त्यात एनएफटीद्वारे त्यांच्या कंपनीच्या खात्यातून ९९ हजार आणि ९८ हजारांच्या दोन रक्कम दोन वेगळ्या खात्यांत वर्ग करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.
काही मिनिटांत खाते रिकामे
या प्रकारानंतर शेख यांनी तत्काळ मोबाइल तपासला असता, त्यांचे युनो एसबीआय अॅप हॅक करून सायबर भामट्याने पैसे काढल्याचे लक्षात आले. या प्रकारामुळे घाबरलेल्या शेख यांनी तत्काळ सातारा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक कृष्णा शिंदे करीत आहेत.