Gold loan fraud : बनावट सोने तारण ठेवून बँकेला १० लाखांचा गंडा file photo
छत्रपती संभाजीनगर

Gold loan fraud : बनावट सोने तारण ठेवून बँकेला १० लाखांचा गंडा

बँकेच्या व्हॅल्युअरच्या संगनमताने महिलेचा प्रताप; सिडको पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून आणि बँकेच्या मान्यताप्राप्त व्हॅल्युअरशी (मूल्यांकनकार) संगनमत करून बँक ऑफ महाराष्ट्रला तब्बल १० लाख १ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार एन-५, बजरंग चौक येथील शाखेत ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१५ रोजी घडला असून, या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.४) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जदार महिला फरीन तबस्सुम नौशीन मलिक (रा. प्लॉट नं. ०२, जहागीर कॉलनी, हसूल) आणि बँकेचा पॅनल व्हॅल्युअर आणि वर्मा ज्वेलर्सचा प्रोप्रायटर पवन सुरेश वर्मा (रा. नवजीवन कॉलनी, हडको) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी बँकेच्या मॅनेजर अनिता गाडेकर (४१, रा. सारा गोकुळधाम सोसायटी, चिकलठाणा) यांच्या तक्रारीनुसार, २१ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपी फरीन मलिक हिने बँक ऑफ महाराष्ट्रच्या बजरंग चौक शाखेत सोने तारण कर्जासाठी अर्ज केला होता. बँकेच्या नियमानुसार, बँकेच्या पॅनलवरील व्हॅल्युअर पवन वर्मा याला सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी बोलावण्यात आले. पवन वर्मा याने २१ ऑगस्ट रोजी ३० ग्रॅमच्या ३ बांगड्या आणि २५ ग्रॅमचे १ ब्रेसलेट तपासून ते ९०% शुद्ध असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले.

या आधारावर बँकेने फरीनला ३ लाख ४१ हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर २८ ऑगस्ट २०२५ रोजी फरीनने पुन्हा बँकेत येऊन आणखी दागिने तारण ठेवले. यावेळीही पवन वर्मा याने १९ ग्रॅमचा नेकलेस, ३ ग्रॅमची अंगठी, ७ ग्रॅमचे झुमके आणि ७१ ग्रॅमच्या ८ बांगड्या तपासून त्या ९१% शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र दिले. या बनावट प्रमाणपत्रांवरून बँकेने तिला दुसरे ६ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज दिले. अशा प्रकारे बँकेने आरोपी महिलेला एकूण १० लाख १ हजार रुपयांचे कर्ज वितरित केले.

थकबाकी १० लाखांच्या घरात

पवन वर्मा याने आपल्या कर्तव्यात कसूर करत जाणीवपूर्वक बनावट दागिन्यांना शुद्ध सोन्याचे प्रमाणपत्र देऊन कर्जदार महिलेशी संगनमत केल्याचे निष्पन्न झाले. या फसवणुकीप्रकरणी ४ ऑगस्ट २०२६ रोजी बँकेची तब्बल १० लाख ४८ हजार २०१ रुपये (भविष्यकालीन व्याज वगळून) थकबाकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक योगेश गायकवाड हे करत आहेत..

दुसऱ्या तपासणीत फुटले बिंग

बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मंजूर झालेल्या सोने तारण कर्ज खात्यांचे दुसऱ्या शाखेतील अधिकारी आणि दुसऱ्या व्हॅल्युअरमार्फत पुनर्मूल्यांकन करणे अनिवार्य असते. त्यानुसार, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुसऱ्या मूल्यांकनकाराने (ज्ञानेश्वर एच. चिंतामणी) या दागिन्यांची तपासणी केली असता हे दागिने शुद्ध सोन्याचे नसून, ते केवळ सोन्याचा मुलामा दिलेले बनावट दागिने असल्याचे उघड झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT