छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व उपपरिसरात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांच्या ७३ जागांवर भरती होत आहे. या जागेसाठी १२ मार्च पर्यंत तब्बल ६ हजार ८३१ अर्ज आले आहेत. एका जा-गेसाठी सरासरी ९३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या आकडेवारीमुळे राज्यातील उच्चशिक्षित बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर आले आहे.
बहुतेक अर्जदार हे पीएचडी पदवीधर असून अनेक उमेदवार नेट-सेट पात्र आहेत. काहींना अध्यापनाचा अनुभवही आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही कायमस्वरूपी नोकरीच्या संधी मिळत नसल्याने मोठ्या संख्येने उमेदवार या भरतीकडे वळल्याचे दिसून येते.
अनेक जण तात्पुरत्या तासिका तत्वावर किंवा करार पद्धतीने अध्यापनाचे काम करत आहेत. त्यांना स्थिर नोकरीची संधी मिळणार असल्याने याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यात प्राध्यापक प्रवर्गातील ८. सहयोगी प्राध्यापक-१२. सहायक प्राध्यापक ५३ अशी पदे भरणार आहेत. या जागा विद्यापीठ व धाराशिव उपपरिसरातील आहेत.
उच्चशिक्षित तरुणांची वाढती संख्या आणि उपलब्ध पदांची मर्यादा यामुळे शिक्षण क्षेत्रातही रोजगाराची स्पर्धा तीव्र होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
अर्जासाठी मुदतवाढ
प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज केलेल्यांना नव्याने अकॅडमिक आणि रिसर्च क्रेडेन्शियल्स (एआरसी) भरावा लागणार असून नवीन उमेदवारांना देखील अर्ज दाखल करता येईल. तर अधिष्ठांताची चार पदे व ज्ञान खोत केंद्र संचालक अशा पाच पदासाठी ८० आवेदन आले आहेत. या सर्वांनी येत्या २५ मार्च सायंकाळी ६ वाजेपर्यंत एआरसी फॉर्मसह हार्ड कॉपी दाखल करणे आवश्यक आहे. असे कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कळविले.