'Balaji Bikaner Sweet Mart's' license suspended
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : सेफ फूड, सेफ महाराष्ट्र नोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कन्नड नालुक्यातील चिंचोली येथील मे. बालाजी बिकानेर स्वीट मार्टवर कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने पेढीचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला असून, पुढील आदेशापर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी मो. फ. सिद्दीकी यांनी १६ पप्टेंबर रोजी पेढीची तपासणी केली. या तपासणीत आवश्यक गुणांपैकी कमी गुण आढळून आले. यामुळे पेढी नियमबाह्य स्थितीत असल्याचे नपासणीत निष्पन्न झाले.
तपासणीदरम्यान स्वयंपाकघराच्या छताला असलेल्या उघड्या भागाला जाळी नसल्याने कीटक च उंदरांचा धोका असल्याचे आढळले. अन्न तयार करण्याच्या ठिकाणच्या भिंतींवर ओलावा, तेल व धूळ साचल्याचेही निदर्शनास आले. पेस्ट्री व दुग्धजन्य पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेफ्रिजरेटर व डीप फ्रीझरमध्ये तापमान निरीक्षणाची व्यवस्था नव्हती.
पेढीत वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा अद्ययावत तपासणी अहवाल उपलब्ध नसून, केवळ २०२२ चा अहवाल असल्याचे आढळले. तसेच अन्न हाताळणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नव्हती. कर्मचाऱ्यांकडून अॅप्रन, हेडगिअर व हातमोज्यांचा वापरही होत नसल्याचे आढळले.
याशिवाय कच्च्या मालाच्या खरेदीची बिले, दैनंदिन स्वच्छतेचे वेळापत्रक आणि पेस्ट कंट्रोलच्या नोंदी उपलब्ध नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. या त्रुटींची गंभीर दखल घेत सहायक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी द. वि. पाटील यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलम ३२(३) अन्वये पेढीचे नोंदणी प्रमाणपत्र पुढील आदेशापर्यंत निलंबित केले आहे. निलंबनाच्या कालावधीत दुकानातून अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक अथवा विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सर्व त्रुटींची पूर्तता करून पुनर्तपासणी झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी स्पष्ट केले.