Bajajnagar robbery case Amol Khotkar's sister arrested by Crime Branch
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: बजाजनगर दरोडा प्रकरणात एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेला कुख्यात दरोडेखोर अमोल खोतकरच्या बहिणीला गुन्हे शाखेने अटक केली. रोहिणी बाबूराव खोतकर (३५, रा. आर्च आंगण, पडेगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
तिच्या घर झडतीत तुळशी वृंदावनात मातीत गाडून ठेवलेले २२० ग्रॅमचे दागिने आणि पिस्तुलाचे ७ काडतुसे पोलिसांनी जप्त केली. दरम्यान, रोहिणी ही १८ जूनला मोबाईल बंद करून दोन दिवस गोव्याला गेल्याचे समोर आले आहे. तिथे मित्राकडे तिने सोने दिल्याचा पोलिसांना संशय आहे. मंगळवारी (दि. २४) न्यायालयात हजर केले असता रोहिणीला २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार, बजाजन गरचे उद्योजक संतोष लड्डन यांच्या बंगल्यात १५ मेच्या रात्री सहा दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी लुटून नेली होती. याप्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत तब्बल २१ आर ोपींना अटक केली आहे. एपीआय रविकांत गच्चे यांनी २६ मे रोजी साजा पूर रस्त्यावर दरोड्यातील मास्टरमाइंड कुख्यात गुन्हेगार अमोल खोतकरचे एन्काउंटर केले होते. त्यानंतर दरोड्यातील आरोपींच्या अटकेचे सत्र सुरू झाले होते. दरम्यान, खोतकरची बहीण रोहिणीच्या चौकशीत तिने पडेगाव येथील गॅरेजसमोर लावलेल्या कारच्या डिक्कीत चांदी असल्याचे सांगितले होते.
तेव्हा पोलिसांनी ३१ किलो चांदी हस्तगत केली होती. खोतकरची मैत्रीण खुशीच्या चौकशीत तिने रोहिणीकडे सोन्याचे दागिने असल्याचा जवाब पोलिसांना दिला होता. तसेच खोतकरचा मित्र आणि आरोपी सुरेश गंगणे आणि रोहिणीच्या एका मैत्रिणीनेही दागिने रोहिणीकडेच असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी तिला सोमवारी रात्री अटक करण्याचा निर्णय घेतला. एपीआय जयश्री कुलकर्णी यांनी न्यायालयाच्या परवानगीने तिच्या अटकेची प्रक्रिया पार पाडली. मंगळवारी पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी रोहिणीला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील सुधीर बनसोडे यांनी बाजू मांडून पोलिस कोठडीची मागणी केली.
मंगळवारी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार, एपीआय विनायक शेळके, काशिनाथ महांडुळे यांच्यासह महिला कर्मचारी-अधिकाऱ्यांनी घरझडती घेतली. घरासमोरील तुळशी वृंदावनात मातीत गाडून ठेवलेले सोन्याची चेन, ब्रेसलेट असा २२० ग्रॅमचे दागिने तसेच पिस्तुलाचे ७काडतुसे सापडली. एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या अमोल खोतकरकडे दोन पिस्तूल होते. त्यातील एकातून त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता. ते पिस्तूल पोलिसांनी यापूर्वीच जप्त केलेले आहे.
न्यायालयात हजर केल्यावर रोहिणीने वडिलांच्या वृद्धपकाळाचे कारण पुढे केले. मला दिवसभर चौकशीला बोलवा, पण रात्री घरी जाऊ द्या, असे म्हटले. दरोडा प्रकरणामुळे आम्हाला त्रास होत असल्याने वडील आणि मला विष घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही, असे रोहिणीने न्यायाधीशांच्या समोर सांगितले.
लड्न यांच्या घरातून साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी, ७० हजारांची रोकड दरोडेखोरांनी लुटली होती. गुन्हे शाखेने अमोल खोतकरचे एन्काउंटर केले. त्यानंतर रोहिणीसह २१ आरोपींना अटक केली. गेल्या महिनाभरात आरोपींकडून ७९४ ग्रॅम सोने, ३२ किलो चांदी, ८ लाखांची रोख, ३ चारचाकी एक दुचाकी वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित सोने अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही.
कुख्यात दरोडेखोर सुरेश गंगणेचा मित्र राजेश साठे याला दोन दिवसांपूर्वी अटक केल्यानंतर गंगणेने विक्रीसाठी दिलेले ४० ग्रॅम सोने साठेकडून जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
रोहिणीला गुन्हे शाखेत चौकशीला बोलावले असता ती १८ जूनला मोबाईल बंद करून गोव्याला निघून गेली होती. गोवा आणि कर्नाटक येथे वास्तव्यास असलेला तिचा मित्र रणजितकडे तिने दागिने दिल्याचा संशय आहे. त्यामुळे गुन्हे शाखेची पथके गोवा आणि कर्नाटक येथे तपासाला जाणार आहेत. दरम्यान, आरोपी रोहिणीने नवीन सिमकार्ड घेतले आहे. तिने तीन संशयास्पद लोकांना कॉल केल्याचे तपासात समोर आल्याने त्या तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.