Bag worth 20 lakhs stolen from jeep in 15 minutes
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जीप लॉक न करताच मोमोज खायला जाणे मेघ इंजिनिअरिंगच्या लेखाधिकऱ्याला चांगलेच भोवले. अवघ्या पंधरा मिनिटांत दुचाकीस्वार दोन चोरांनी बोलेरो जीपमधून २० लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली. ही घटना गुरुवारी (दि. २६) सायंकाळी सहा ते सव्वासहाच्या सुमारास डी मार्टजवळ, एन-१३ हडको भागात घडली.
फिर्यादी बहालबाबू सत्यम कुरपुरोल (२७, रा. दुगड, जि. अनकापल्ली, ह.मु. सावंगी, मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर, गेस्ट हाऊस) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते कंपनीत एक वर्षांपासून लेखाधिकारी म्हणून काम करतात.
गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कंपनीचे हैद्राबाद येथील प्रोजेक्ट कॉर्डनिटर आनंदराव यांनी त्यांच्याकडे कंपनीचे २० लाख रुपये जालना येथील ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी दिले. कुरपुरोल यांच्यासोबत बोलेरो जीपमध्ये (एमएच-२०-ईई-९८८८) कंपनीचे राजरेड्डी, मल्लेश्वरराव आणि चालक किरण चव्हाण होते. एकाला रेनकोट घ्यायचा असल्याने ते पैठण गेट येथे गेले होते.
तेथून जालना येथे जाण्यासाठी दिल्ली गेट हर्सल टी पॉईंट मार्गे जात असताना भूक लागल्याने त्यांनी डीमार्टच्या बाजूला चालकाला गाडी घेण्यास संगितले. मोमोजच्या गाडीवर मोमोज खाऊन सर्वजण परत आले. तेव्हा त्यांना गाडीमध्ये ठेवलेली २० लाख रुपयांची बॅग गायब असल्याचे दिसले.