आजाद समाज पार्टीने पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढला असता तो पोलिसांनी अर्ध्यातच अडवल्याने घोषणाबाजी करताना कार्यकर्ते. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar protest : पालकमंत्र्यांच्या घरावर निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला

आजाद समाज पार्टीचे कार्यकर्ते ताब्यात; पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात भूमिका जाहीर करावी, या मागणीसाठी आजाद समाज पार्टीच्या वतीने सोमवारी (दि. २५) पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा आयोजित केला होता. पोलिसांनी अर्ध्या रस्त्यातच मोर्चा अडवून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाज आक्रमक झाला आहे. उपवर्गीकरणाबाबत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे आजाद समाज पार्टीच्या वतीने सोमवारी दुपारी शिरसाट यांच्या घरावर मोर्चा आयोजित केला होता.

सकाळपासूनच कांचनवाडी चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दुपारी १२.३० वाजता पक्षाचे प्रदेश महासचिव अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कांचनवाडी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली काही अंतरावर पोलिसांनी मोर्चा आडवला.

कार्यकर्ते ताब्यात

यावेळी कार्यकर्त्यांनी शिरसाट यांच्या घराकडे जाण्याचा आग्रह धरला. यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. शेवटी पोलिसांनी बाळाचा वापर करीत अरविंद कांबळे, शिवाजी वीर, विजय शिनगारे, मधुकर ढेपे, अनामी मोरे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन, काही काळानंतर त्यांची सुटका केली.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा

शिरसाट यांनी उपवर्गीकरणाबाबत भूमिका जाहीर करावी. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कांबळे यांनी यावेळी दिला. आंदोलनात राहुल साबळे, सुनील वाकेकर, तातेराव ससाणे, शेख जावेद, नवाब पटेल, रेखा राजभोग, सारिका जाधव, सुरेश जगधने, सचिन निकम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT