छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले. या नामांतराला वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. परंतु, लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शहराचे नाव औरंगाबाद असेच असणार आहे.
औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य या नावाने शहरातील तिन्ही मतदारसंघांची निवडणूक होत आहे. राज्य सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याची प्रक्रिया दोन वर्षांपूर्वी सुरू केली होती. ती मागील वर्षी १७ सप्टेंबर २०२३ रोजी पूर्ण झाली. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. त्यापाठोपाठ सर्व सरकारी कार्यालयांनी लगेच औरंगाबाद नावाचा वापर थांबवून अभिलेखांमध्ये छत्रपती संभाजीनगर असेच नाव वापरण्यास सुरुवात केली.
सरकारी कार्यालयांच्या पाट्या बदलल्या. दरम्यान, यंदा एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक पार पडली. त्यावेळी या मतदारसंघाचे नाव छत्रपती संभाजीनगर होईल, असे अपेक्षित होते. परंतु ही निवडणूक जुन्या औरंगाबाद नावानेच झाली. निवडणूक आयोगाने लोकसभा मतदारसंघाच्या नावात कोणताही बदल केला नाही.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ नावानेच सर्व प्रक्रिया पार पडली. आता विधानसभेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीतही औरंगाबाद नावानेच मतदारसंघांची नावे ठेवण्यात आली आहेत. शहरात औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तिन्ही मतदारसंघांच्या नावांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील मतदारसंघांची नावे जुनीच ठेवण्यात आली आहेत. औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य याच नावाने ही निवडणूक होत आहे. दरम्यानच्या काळात काही बदल झाला तर तसे सर्वांना कळविण्यात येईल.दिलीप स्वामी, - जिल्हाधिकारी.