Attention of aspirants to objections to the ward structure of the Municipal Corporation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर आक्षेपांचा पाऊस सुरू आहे. पहिल्या पाच दिवसांत केवळ ३९ जणांच्याच हरकती महापालिकेला प्राप्त झाल्या. मात्र मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांतच आक्षेपांचा आकडा ३६५ वर गेल्याने आता आर-ाखड्यात काय बदल होणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
राज्य निवडणूक आयोग आणि शासनाच्या नगरविकास विभागाच्या आदेशावरून महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार केला. तसेच हा आराखडा नागरिकांच्या सूचना हरकतींसाठी २२ ऑगस्टाला प्रसिद्ध केला. त्यावर आता आक्षेपांचा पाऊस पडत आहे. विविध प्रभागांतून अनेक इच्छुक अर्ज दाखल करीत आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुकांचा समावेश आहे.
अनेकांनी तर नकाशे आणि हद्दींमध्ये कशा विसंगती आहेत, हेही दर्शविले आहे. त्यामुळे आता प्रभाग रचनेच्या या प्रारूपमध्ये नव्याने काय बदल होतील, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. परंतु सत्ताधारी पक्षांचे इच्छुक तणावमुक्त असल्याचे दिसत आहे. दरम्यान, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्या वगळता कामकाजाच्या दिवशी नागरिकांना दुपारी ३ वाजेपर्यंत आक्षेप नोंदवता येत आहेत. त्यामुळे आज शेवटचा दिवस असून, त्यानंतर ५ ते १२ सप्टेंबरदरम्यान या हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे.