Attempt to strangle mother-in-law with wife, husband arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : लग्नात ४० तोळे सोने देऊन धूमधडाक्यात लग्न लावले. तरीही ४ बीएचके फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन ये, असे म्हणत पतीसह सासरच्यांनी प्राध्यापक असलेल्या विवाहितेचा अतोनात छळ केला. त्यानंतर तिच्या माहेरच्यांनी २ बीएचके फ्लॅटही दिला. तरीही छळ सुरूच राहिल्याने विवाहितेची आई बुधवारी (दि.६) समजावून सांगण्यास गेली तेव्हा पतीने पत्नीसह सासूचा गळा दाबून दोघींना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उल्कानगरी भागात घडला.
पती पवन विष्णू ढाकणे (३५), सासरा विष्णू, सासू आशा आणि नणंद पूजा अशी आरोपींची नावे आहेत. जवाहरनगर पोलिसांनी आरोपी पती पवनला अटक केली आहे. तो व्यावसायिक असून, फिर्यादी ३४ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. त्यांचा विवाह आर ोपी पवन सोबत २० एप्रिल २०१५ रोजी झाला. लग्नात सर्व वस्तू, ४० तोळे सोने दिले. धूमधडाक्यात लग्न लावून दिले. महिनाभरानंतर सासू घरातील कामावरून अपमानित करू लागली.
पती-पत्नीत भांडण लागण्याचा प्रयत्न करू लागली. तरीही विवाहिता सर्व सहन करत संसार करत होती. त्यांना दोन मुलेही झाली. ती नोकरी करून घर सांभाळत होती. तेव्हा सासू तिला तुझी मुले मी सांभाळते म्हणून तू माझ्या जीवावर नोकरी करते, असे म्हणून मानसिक त्रास देऊ लागली. एके दिवशी सासूने स्टीलची बाटली डोक्यात मारली होती. त्यानंतर माहेरच्यांकडून ४ बीएचके फ्लॅट घेऊन दे, असे म्हणत छळ सुरू झाला. तेव्हा तिच्या वडिलांनी २ बीएचके फ्लॅट दिला. पती पवनने मी तिथे राहणार नाही, तूही कशी राहते ते बघतो. घरात गुंड पाठवेल, अशी धमकी दिली. नणंद पूजा डॉक्टर असून, तिनेही तू कशी इथे राहते ते बघते, अशी धमकी दिली. त्रासामुळे विवाहिता दोन वर्षांपासून झोपेच्या गोळ्या घेत होती. ती माहेरी राहायला गेली तेव्हा तिच्या वडिलांना तिथे येऊन पवनने मारहाण केली होती.
पतीच्या मोबाईलमध्ये दुसरीसोबतचे फोटो
२०२१ मध्ये विवाहितेने पतीचा मोबाईल पहिला तेव्हा त्यात दुसऱ्या एका मुलीसोबत फिरायला गेल्याचे फोटो दिसले. विचारणा केली तेव्हा तुला काय करायचे मी कितीही पोरींसोबत संबंध ठेवेल ? मी दुसरे लग्न करेल, अशी धमकी दिली.
सासू दहा वेळा म्हणाली स्वारी तरीही...
विवाहितेची आई बुधवारी (दि.६) जावयाला समजावण्यास गेली. तेव्हा पवनने वाद घालून पत्नीचा गळा दाबला. तिची आई सोडवायला गेली तेव्हा त्याने त्यांचाही गळा दाबला. दहा वेळा सॉरी म्हणत होत्या. पण पवन ऐकत नव्हता. त्याने टीव्ही, आरसा फोडला. पोलिसांना घाबरत नाही. पोलिस घरी आले तर सगळ्यांना उभे कापीन, अशी धमकी दिली. विवाहितेने तिच्या भावाला फोन करून कळविले. त्याने जवाहरनगर पोलिसांना घेऊन घर गाठले. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास एपीआय लोहकरे करत आहेत.