Attempt to kill husband in his sleep with the help of lover
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या रिक्षाचालक पतीचा पत्नीने झोपेतच प्रियकराच्या मदतीने ओढणीने गळा आ-वळून हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने दोघांना प्रतिकार केला. तेव्हा प्रियकराने छातीवर बसून उशीने तोंड दाबले. पती ओरडत होता, पण पत्नीने अगोदरच टीव्हीचा आवाज वाढवून ठेवला होता. अखेर घरमालकाने खोलीचा दरवाजा जोरजोरात वाजविल्याने पत्नी दार उघडून पळाली तर प्रियकराला पतीने पकडून ठेवल्याने तो हाती लागला. त्याला नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. हा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.२) रात्री एकच्या सुमारास पडेगावात घडला.
राजू भानुदास खैरे (रा. पैठण खेडा, ता. पैठण) असे अटकेतील आरोपी प्रियकराचे नाव असल्याची माहिती छावणी ठाण्याचे प्रभारी विवेक जाधव यांनी रविवारी दिली. अधिक माहितीनुसार, ४२ वर्षीय फिर्यादी (सचिन नाव बदलेले आहे) रिक्षाचालक असून, पडेगावात भाड्याने खोली करून पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असे राहतात. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास रिक्षा चालवून घरी आले. मुलांसोबत जेवण करून झोपी गेले. तेव्हा पत्नी (रेखा नाव बदलेले आहे) जागीच होती.
झोपेत असताना रात्री एकच्या सुमारास रेखाने तिचा प्रियकर राजू खैरेला घराचे गेट उघडून आत घेतले. त्यानंतर खैरे आणि रेखाने ओढणीने सचिन यांचा ओढणीने गळा आवळला. सचिन यांना जाग आल्याने ते पलंगावरून खाली पडले. तेव्हा दोघांनी त्यांना मारहाण करून राजू त्यांच्या छातीवर बसला.
उशीने सचिन यांचे तोंड दाबले. रेखाने सचिन यांचे हातपाय धरून ठेवले. सचिन यांनी दोघांना प्रतिकार करून बाजूला ढकलले. जोरजोरात ओरडले. मात्र रेखाने अगोदरच टीव्हीचा आवाज वाढवून ठेवला होता. सचिन यांनी जोरजोरात दरवाजा वाजविला. त्यामुळे घरमालक दोघे जण आले. त्यांनी दरवाजा वाढविला. तेव्हा घाबरून आरोपी रेखाने दरवाजा उघडून बाहेर पळून गेली. सचिन यांनी प्रियकर राजूला पकडून ठेवले. गोंधळ ऐकून गल्लीत सर्व लोक जमा झाले होते. याप्रकरणी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा छावणी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. प्रियकर राजूला रविवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे.
पत्नी रेखाने तिचा प्रियकर राजू याला घरात बोलावून घेतानाच मुलांना अगोदरच बाहेर रिक्षात बसवून ठेवले होते. सचिनचा खून करून दोघेही पळून जाणार होते. मात्र त्यांचा कट उधळला गेल्याने पत्नी मुलांना घेऊन पसार झाली, मात्र प्रियकर राजूच्या हातात बेड्या पडल्या.
आरोपी प्रियकर राजू खैरे आणि रेखा यांचे कंपनीत काम करताना सूत जुळले. अनेक महिन्यांपासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते. विशेष म्हणजे दोघेही विवाहित असून, दोघांना मुलंबाळ आहेत. मात्र, रेखाचे प्रेमप्रकरण सचिनला समजले होते. त्यामुळे तो अडथळा ठरेल आणि काही करेल त्यापूर्वीच त्याची हत्या करून पळून जाऊ, असा दोघांनी कट रचला होता, असे तपासात समोर आले आहे.