Crime News : मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावर हल्ला crime news
छत्रपती संभाजीनगर

Crime News : मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावर हल्ला

चालकाच्या तोंडावर कडे मारून केले रक्तबंबाळ : रेल्वे स्टेशन रोडवरील प्रकार; दोन अनोळखी दुचाकीस्वारांवर वेदांतनगर पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Attack on the Chief Judicial Magistrate's official vehicle

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) यांच्या शासकीय वाहनाला अडवून दोन दुचाकीस्वारांनी हातोडीने हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. मोपेड बाजूला घे असे वाहनातील शिपायाने म्हटल्याचा कारणावरून हा हल्ला करण्यात आला. यावेळी मोपेडस्वाराने वाहनाच्या चालकाला शिवीगाळ करत त्याच्या तोंडावर लोखंडी कडे मारून त्याला रक्तबंबाळ केले.

ही घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी ४:३० वाजता रेल्वे स्टेशन रोडवरील विट्स हॉटेल चौकात घडली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी दुचाकीस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शेख एकबाल शेख इब्राहिम (४६, रा. बायजीपुरा) यांच्या तक्रारीनुसार, ते गेली दोन वर्षे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या शासकीय वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी मुख्य न्यायदंडाधिकारी हे वरिष्ठ लिपिक, शिपाई पाटील आणि चालक एकबाल यांच्यासोबत शासकीय वाहनाने न्यायालयीन कामकाजासाठी पैठण येथे गेले होते.

तेथील कामकाज आटोपून ते सायंकाळी साडेचारच्या सुमारास शहरात परतले. रेल्वे स्टेशन रोडने विट्स हॉटेल चौकातून जात असताना, अचानक एक मोपेडस्वार त्यांच्या वाहनासमोर आला. शिपाई पाटील यांनी त्याला मोपेड बाजूला घेण्याची विनंती केली असता, तो मोपेडवरून खाली उतरला आणि त्याने थेट शिवीगाळ सुरू केली.

तो हाताने गाडीच्या काचेवर जोरजोरात मारू लागला. चालक एकबाल यांनी काच उघडली नाही, तेव्हा त्या मोपेडस्वाराच्या पाठीमागे एका स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दुसऱ्या तरुणाने दुचाकीच्या हँडलवर असलेली हातोडी काढली आणि शासकीय वाहनाच्या दरवाजावर मारायला सुरुवात केली. हातावर हातोडीचे वार पडत असल्याने चालक एकबाल यांनी गाडीची काच खाली केली. तेव्हा मोपेडस्वाराने त्याच्या हातातील लोखंडी कडे काढून एकबाल यांच्या तोंडावर जोरात मारले, ज्यामुळे त्यांच्या तोंडातून रक्त वाहू लागले.

वाहनावरील मुख्य न्यायदंडाधिकारी पाटी पाहून पळाले

या झटापटीत तिथे नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. याचवेळी त्या हल्लेखोरांचे लक्ष वाहनावरील मुख्य न्यायदंडाधिकारी, औरंगाबाद या पाटीकडे गेले. ती पाटी पाहताच त्यांची भंबेरी उडाली आणि त्यांनी थेट बन्सीलालनगरच्या दिशेने पळ काढला. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर त्यांनी गर्दी पांगवली. त्यानंतर चालक एकबाल यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांना सुरक्षितपणे जिल्हा न्यायालयात सोडले आणि नंतर वेदांतनगर ठाणे गाठून तक्रार दिली. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक निसार शेख करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT