Sanjay Shirsat House Attack Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाटांच्या घरावर मद्यधुंद तरुणांकडून हल्ल्याचा प्रयत्न; दोन सुरक्षारक्षक जखमी, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Sanjay Shirsat House Attack: छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर तीन मद्यधुंद तरुणांनी गोंधळ घालत दारूच्या बाटल्या फोडल्याचा प्रकार घडला.

Rahul Shelke

Sanjay Shirsat House Attack: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर तीन मद्यधुंद तरुणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. तरुणांनी घरासमोर दारूच्या बाटल्या फोडल्या. तसेच घराच्या दिशेने बाटल्या फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेत दोन सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेनंतर मंत्री शिरसाट यांनी पोलिसांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साधारण साडेदहा ते अकराच्या सुमारास तीन तरुण संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर आले. हे तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी घराबाहेर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी दारूच्या बाटल्या फोडण्यात आल्या. तरुणांना हटकल्यानंतर त्यांनी घराच्या दिशेने बाटल्या फेकल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेनंतर संजय शिरसाट यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस आयुक्तांना फोन केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. एका पालकमंत्र्याच्या घराबाहेर अशी घटना घडत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

माझ्यावर हल्ला झाला म्हणून या घटनेकडे विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नाही. मात्र, एका पालकमंत्र्याच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न होत असताना किमान पोलिसांनी त्याची दखल घ्यायला हवी, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, संजय शिरसाट यांच्या घराबाहेर अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही एक तरुण चाकू घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्याची घटना घडली होती. त्यामुळे आताच्या प्रकाराने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT