ATS Raids Chhatrapati Sambhajinagar; 13 Suspects Under Intense Interrogation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोग्रा गँगशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी (दि. १३) राज्यभरात छापेमारी केली. पहाटेच्या सुमारास टाकण्यात आलेल्या या धाडीत शहरातील तब्बल १३ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, तपासाअंती तांत्रिकदृष्ट्या कोणतेही ठोस गेदोरे हाती न लागल्याने या सर्वांना सोडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, एटीएसच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दुबईतून चालवतो नेटवर्क, तरुणांना जाळ्यात ओढण्याचा डाव राज्यातील काही तरुण एका आंतरराष्ट्रीय टोळीच्या संपर्कात असल्याची गुप्त माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. पाकिस्तानी गैंगस्टर शहजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी असून, तो सध्या दुबईत बसून आपली गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचे समोर आले आहे.
देशातील तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना कट्टरतावाद आणि हेरगिरीच्या जाळ्यात ओढण्याचा त्याचा डाव असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या माहितीच्या आधारेच एटीएसने राज्यातील छत्रपती संभाजीनगरसह नालासोप-धाारा, मिरारोड, मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव येथे एकाच वेळी छापेमारी केली.
डोग्रा गैंग आणि भट्टीच्या संपर्कात असलेल्या संशयितांची सध्या कसून झाडाझडती सुरू आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरून गँगस्टर्सशी संपर्क ठेवणारे, त्यांच्या पोस्टना प्रतिसाद देणारे किंवा समर्थन करणारे अनेक जण एटीएसच्या रडारवर आले आहेत. डिजिटल कनेक्शनच्या आधारे नेटवर्कचा विस्तार शोधला जात आहे.
मोबाईल आणि सीडीआरची तपासणी
पाकिस्तानी गँगस्टरसोबत काही आर्थिक व्यवहार किंवा संभाषण झाले आहे का, हे तपासण्यासाठी एटीएसने या १३ जणांचे मोबाईल फोन, कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) आणि सोशल मीडिया खात्यांची सखोल तपासणी केली. मात्र, या तांत्रिक तपासात संशयास्पद असे काहीही निष्पन्न न झाल्याने चौकशीअंती त्यांना सोडण्यात आल्याचे समजते. तरीही, एटीएसची या सर्व घडामोडींवर करडी नजर आहे.
पहाटे ६ वाजताच एटीएसची धडक
एटीएस आणि गुप्तचर यंत्रणेच्या (आयबी) संयुक्त पथकाने बुधवारी पहाटे ६ वाजल्यापासूनच शहरात कारवाईला सुरुवात केली. एमआयडीसी वाळूज, मिलकॉर्नर, वेगमपुरा, भोईवाडा या भागांसह जुन्या शहरातील अन्य भागातून १३ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.