Ashadhi Wari : Nath's Palkhi Ceremony Welcome at Mungshi-Bittergaon
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर येथील आषाढीवारी सोहळ्यासाठी प्रस्थान झालेला श्रीसंत एकनाथ महाराज पादुका पालखी सोहळा रविवारी (दि.१९) मुंगशी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे दुपारी दाखल झाला. प्रशासनाच्या वतीने नाथांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. सोहळ्यातील वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत झाले. यावेळी भाविकांनी भानुदास एकनाथांच्या जयघोषात पादुकांचे दर्शन घेतले.
नाथांचा पालखी सोहळा परंडानगरीत मुक्काम करून रविवारी सकाळी दिंडीने प्रस्थान केले. पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातील मुंगशी (ता. माढा) येथे दुपारच्या विसाव्यासाठी दाखल होताच परिसरातील भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी करून भानुदास एकनाथांचा जयघोष करत नाथांच्या पादुकावर जेसीबी मशीनद्वारे पुष्पवृष्टी केली. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, अप्पर पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा, पोलिस निरीक्षक चोरमले, रमेश क्षीरसागर, अरविंद गटकुळ, मुंगशीचे सरपंच कमल सूर्यकांत महाडिक, उपसरपंच शंकर चंद्रकांत काळे, लिस पाटील नीलम, नेमीनाथ मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी नाथांच्या पादुकांचे पूजन केले.
सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, ज्ञानेश महाराज गोसावी पालखीवाले, अॅड, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांच्यासह पायी दिंडी सोहळ्यात चालणाऱ्या महाराज मंडळीचे व वारकऱ्यांचे स्वागत केले. मुंगशी येथील भाविकांनी आलेल्या वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती.
स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत विभागाने परिसर स्वच्छ ठेवून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष आरोग्य पथक तयार ठेवले होते. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी गोळ्या, औषधींचे वाटप केले. वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पावसापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केली होती.
जोरदार पावसात दुपारी मुंगशी गावातील भाविकांचा निरोप घेऊन पालखी सोहळा तेराव्या मुक्कामासाठी बिटरगाव पंचक्रोशीत सायंकाळी दाखल झाला. यावेळी परिसरातील भाविक भक्तांनी नाथांच्या पादुकांची समाज आरती करून आलेल्या वारकऱ्यांसाठी मुक्कामाची व्यवस्था केली होती. सोमवारी (दि.२०) दुपारी सोहळ्याचे चौथे रिंगण कव्हेदंड (ता. माढा) या ठिकाणी होणार आहे. सोहळ्याचा चौदावा मुक्काम कुई (ता. माढा) येथे होणार आहे.