As soon as the water rises, the water meter will be fitted to the taps
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरवासीयांना येत्या डिसेंबरपासून दररोज पाणीपुरवठा करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. त्यासोबतच नळांना वॉटर मीटर बसवण्याच्या हलचालींनाही वेग आला आहे. या कामाचा डीपीआर तयार करण्यासाठी तातडीने एजन्सी नियुक्त करा, असे आदेश महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. त्यामुळे पाणी वाढताच नळांना मीटर बसणार आहे.
२४ तास शहरवासीयांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी राज्य व केंद्र शासनाने अमृत २ मधून २७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. यात शहरासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यासोबतच शहराच्या विविध भागांत ५९ जलकुंभ उभारण्यात येत आहेत. तर शहरांतर्गत सुमारे १९०० किलोमीटर लांबीच्या वितरण वाहिन्यांचे जाळे टाकण्यात येत आहे.
सध्या ७३० किमी अंतरातील अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम शिल्लक आहे. जायकवाडी येथे जॅकवेलच्या कामातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करून येत्या महिनाभरात पंप बसवण्याचे काम सुरू केले जाणार आहे. डिसेंबरअखेरपासून शहराला २०० एमएलडी पाणी दिले जाणार आहे. तसे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार जीव्हीपीआर एजन्सीला दिले आहेत. पहिल्या टप्प्यात २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून शहराला २०० एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने आता प्रत्येक नळांना वॉटर मीटर बसवण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. या कामाचा डीपीआर तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.
प्रत्यक्षात शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी २०० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु डिसेंबरमध्ये नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू होताच शहराला २०० एमएलडी आणि जुन्या १२०० आणि ९०० मधून १७१ एमएलडी असे एकूण ३७१ एमएलडी पाणी दररोज शहराला मिळणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.
सध्या शहराला पाच ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपट्टी अर्ध्या इंचीच्या नळ कनेक्शनधारकांकडून ४ हजारांऐवजी २ हजार घेण्यात येत आहे. तसेच वसुलीची मोहीमही सक्तीने राबविणे टाळले जाते. परंतु नव्या जलवाहिनीतून पुरवठा सुरू होताच पाणीपट्टी पुन्हा पूर्वीप्रमाणे केली जाणार आहे.
या वॉटर मीटरसाठी निविदा प्रक्रिया राबविणे, तसेच मीटरचा प्रकार, सॉफ्टवेअर, विलिंगची प्रक्रिया, नियंत्रण ठेवण्यासाठी कॉमन कंट्रोल सेंटर या सर्वांचा डीपीआरमध्ये समावेश राहणार असल्याने एजन्सी नियुक्तीचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत.