छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : पत्नीवरून शिवीगाळीचा वाद; मित्राचा खून, तिघे अटकेत

कांचनवाडी परिसरातील घटना; तीन आरोपी अटकेत

पुढारी वृत्तसेवा

Argument involving verbal abuse over wife leads to friend's murder; three arrested

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दारू पित असताना पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी मिळून राजू किसन वंजारी (३३, रा. गौतमनगर, कांचनवाडी) याचे डोके झाडावर आदळून निघृण हत्या केली. ही घटना सोमवारी (दि.२९) मध्यरात्री कांचनवाडी परिसरातील वुडरीज स्कूलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात घडली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पांडुरंग काळुबा गायकवाड (४०), युवराज गोरक्ष गायकवाड (३८) आणि सोनू सर्जेराव गव्हाणे (३४, तिघे रा. काश्मीरनगर, कांचनवाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी बुधवारी (दि. १) दिली. मृताचे वडील किसन बापुराव वंजारी (६६) यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी सायंकाळी राजू वंजारी आणि त्याचे मित्र आरोपी सोनू गव्हाणे, युवराज गायकवाड आणि पांडुरंग गायकवाड हे वुडरीज स्कूलच्या बाजूला मोकळ्या जागेत झाडाखाली दारू पिण्यासाठी बसले होते.

दारू पित असताना पत्नीवरून शिवीगाळ केल्याने वाद सुरू झाला. या वादातून संतापलेल्या सोनू गव्हाणे, युवराज गायकवाड आणि पांडुरंग गायकवाड यांनी राजूला बेदम मारहाण केली आणि त्याचे डोके थेट झाडावर आदळले. आरोपी सोनू गव्हाणे याने राजूला दुचाकीवरून त्याच्या घरी आणून सोडले व तिथून काहीही न बोलता माघारी निघाला.

राजूच्या वडिलांनी त्याची नाडी तपासली असता श्वास बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पुन्हा सोनू व त्याच्या मित्रांनी राजूला उपचारासाठी खासगी हॉस्पिटल व नंतर घाटीत नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत-घोषित केले. दरम्यान, सातारा पोलिसांना घटनेची माहिती मध्यरात्री १२:१५ वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालयातून एलएलसी प्राप्त झाल्यानंतर समजली. पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक निर्मला राख यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कुटुंबाचा आधार हरपला

वंजारी कुटुंबीय मूळचे नांदेडचे असून गेल्या २५ वर्षांपासून शहरात मजुरी करून उदरनिर्वाह करत आहे. राजू याच्या वृद्ध आई-वडील, पश्चात पत्नी आणि तीन लहान मुले आहेत. त्याची आई गेल्या दोन वर्षांपासून अर्धांगवायूने अंथरुणाला खिळून आहे, तर पत्नी घरकाम करून संसाराला हातभार लावते. राजूच्या जाण्याने कुटुंबाचा आधारच हरपला असून दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT