Appointment of administrators to Gram Panchayats whose term has expired
राजू वैष्णव सिल्लोड : जानेवारी-फेब्रुवारीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना प्रशासक मिळाल्याने गाव पातळीवरील रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळणार आहे.
जिल्ह्यातील ६०५ तर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींची मुदत संपून जवळपास सहा महिन्यांपेक्षा आधिक महिने झालेले आहे. आधी निवडणुका रखडल्या. त्यात प्रशासक नियुक्तीचे घोंगडे भिजत राहिल्याने गाव पातळीवरील ग्राम पंचायत विकासकामे रखडलेली होती. मात्र आता प्रशासकांची नियुक्ती करण्यात आल्याने विकासकामांना गती मिळणार असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ३८ नुसार सरपंच व ग्रामपंचायतीला प्राप्त असलेले अधिकार, कर्तव्ये प्रशासक म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त राहणार आहे.
प्रशासक म्हणून पंचायत विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी सांख्यिकी, आरोग्य विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख (प्रभारी वगळता), शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अंधारी, अजिंठा, अंभई, भराडी, शिवणा, आमठाणा, भवन, बोरगाव सारवणी, पळशी, गोळेगाव, देऊळगाव बाजार, कोटनांद्रा, डोंगरगाव, धानोरा, गव्हाली तांडा, जीवरग टाकळी, म्हसला आदी ८२ गावांचा समावेश आहे.
युक्त प्रशासकांना ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील नियमांचे पालन करावे लागणार आहे. यातआर्थिक अनियमितता, गैरवर्तन किंवा कर्तव्यात दुर्लक्ष झाल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद (सेवा, शिस्त व अपील) नियम, १९६४ नुसार शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असे आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे.
प्रशासक नियुक्तीसाठी लॉबिंग ?
दरम्यान ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करतानाही राजकीय नेत्यांकडून लॉबिंग करण्यात आल्याची माहिती आहे. प्रशासक म्हणून शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची आधिक मागणी होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर प्रशासक नियुक्तीत लॉबिंग करण्यात आल्याने ग्रामपंचायतींच्या खात्यावर पडून असलेला निधी खर्च करताना गटविकास अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी अट घालण्यात येणार असल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तसे पत्रच पंचायत समितीस्तरावर काढले जाऊ शकते-
लाखोंचा निधी खात्यावर पडून
दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अंधारी, भराडी, शिवणा, अजिंठा, आमठाणा, भवन, पळशी अशा मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर मुदत संपलेल्या ८२ ग्रामपंचायतींच्या खात्यावर लाखो रुपयांचा निधी पडून आहे. आता हा निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र विकासकामे करताना नियुक्त प्रशासक, ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. नसता वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. असे असले तरी प्रशासकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बारकाईने नजर राहणार आहे.