Swachh Survekshan : स्वच्छ सर्वेक्षणात शहराच्या निकालाची उत्सुकता file photo
छत्रपती संभाजीनगर

Swachh Survekshan : स्वच्छ सर्वेक्षणात शहराच्या निकालाची उत्सुकता

नवी मुंबईने इंदूरला | टाकले मागे- संभाजीनगरचे टॉप-१० चे लक्ष्य, दोन दिवसांत क्रमवारी होणार स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

Anticipation surrounds the city's results in the Swachh Survekshan (Cleanliness Survey)

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देशातील स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत यंदा नवी मुंबईने ऐतिहासिक कामगिरी करत सलग आठ वर्षे अव्वल राहिलेल्या इंदूरला मागे टाकले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये नवी मुंबईने देशात पहिला क्रमांक पटकावल्याने आता छत्रपती संभाजीनगरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत महापालिकेने यंदा पहिल्या दहामध्ये स्थान मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, शहराची नेमकी कामगिरी काय राहिली, याचे चित्र पुढील दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

केंद्रीय आवास व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने दिल्लीत आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्या शहरांचा गौरव करण्यात आला. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत ग्रेटर विशाखापट्टणमने पहिला, जबलपूरने दुसरा, तर लखनऊने तिसरा क्रमांक मिळविला. या श्रेणीत छत्रपती संभाजीनगरचाही समावेश आहे.

मात्र, पहिल्या तीन क्रमांकांचीच घोषणा करण्यात आली असून, चौथ्या क्रमांकापासून पुढील शहरांची सविस्तर क्रमवारी येत्या दोन दिवसांत जाहीर होणार आहे. त्यामुळे शहराचा क्रमांक कितवा लागतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळविण्यासाठी महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यंदा कचरा संकलन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, प्रक्रिया प्रकल्पांची कार्यक्षमता, मुख्य रस्त्यांची स्वच्छता आणि नागरिकांमध्ये जनजागृती यावर विशेष भर देण्यात आला. स्वच्छता अॅपच्या माध्यमातून तक्रारींचे निराकरण करण्याची मोहीमही राबविण्यात आली.

दरम्यान, नवी मुंबईने सुपर स्वच्छ लीगमध्ये स्थान मिळविताना सात तारांकित कचरामुक्त शहर आणि वॉटर प्लस दर्जा कायम राखला. जीपीएस ट्रॅकिंगद्वारे कचरा संकलन वाहनांवर नियंत्रण, टेक्स्टाईल वेस्ट प्लांटची उभारणी आणि सांडपाण्याचा पुनर्वापर यांसारख्या आधुनिक उपाययोजनांनी नवी मुंबईला अव्वल स्थान मिळवून दिले.

स्वच्छ सर्वेक्षणातील क्रमवारी केवळ प्रतिष्ठेचा विषय नसून, केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून मिळणाऱ्या निधीच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरते. त्यामुळे यंदा राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे फलित मिळणार का आणि संभाजीनगर पहिल्या दहामध्ये झेप घेणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT