Sambhajinagar Accident News : पुन्हा हायकोर्टजवळ सुसाट कार दुभाजकावर धडकून अपघात  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Accident News : पुन्हा हायकोर्टजवळ सुसाट कार दुभाजकावर धडकून अपघात

शहरातील दुभाजकांची उंची, रस्त्याच्या रुंदीचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

Another accident near the High Court after a speeding car crashed into a divider

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : जालना रोडवर मनपाने सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम अर्ध्यावर सोडून दिली. परिणामी काही ठिकाणी रस्ता रुंद तर कुठे अरुंद अशी अवस्था होऊन बसली आहे. त्यात दुभाजकांची उंची कमी असल्याने सुसाट वाहने थेट दुभाजकावर चढून अपघाताचे प्रकार वाढले आहे.

बुधवारी (दि. २७) दुपारी दोनच्या सुमारास हायकोर्टपासून जवळच चालकाला फिट आल्याने नियंत्रण सुटून कार दुभाजकावर चढून पुन्हा एक अपघात झाला. कारचा चुराडा झाला, मात्र एअरबॅग उघडल्याने दाम्पत्य सुखरूप बचावले.

सुरज खुशालसिंग राजपूत (३२, रा. हनुमाननगर) हे त्यांची पत्नीसोबत कार (एमएच- २०-ईजे- ४३३४) ने सेव्हनहिलकडे जात होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास हायकोर्टजवळ त्यांना फिट आला. कारवरील नियंत्रण सुटले आणि सुसाट कार दुभाजकाची सुरक्षा जाळी तोडून थेट जालना रोडच्या दुभाजकावर मधोमध चढली.

नागरिकांनी धाव घेत राजपूत यांना रिक्षाने जवळच्या रुग्णालयात नेले. घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला देण्यात आली. पुंडलिकनगर डायल ११२ चे अंमलदार मोतीराम होलगडे, अमोल आहेर, मदन गोरे हे घटस्थळी पोहोचले. अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

उड्डाणपुलावर दुभाजक रस्त्याला टेकले

जालना रोडवर दुभाजकांची उंची अतिशय कमी असून, उड्नु-ाणपुलांवर तर दुभाजक थेट रस्त्याला टेकले आहेत. त्यामुळे तेथून अनेक जण शॉर्टकटही घेत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करताना दिसते.

जालना रस्त्याचे रुंदीकरण कधी होणार ?

महापालिकेने मुकुंदवाडीपासून पाडापाडी सुरू केली. मात्र महावीर चौक ते सेव्हनहिल उड्डाणपुलापर्यंत येताच मनपाचे बुलडोझर थांबले. त्यामुळे या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक सुसाट कार दुभाजकावर धडकून पलटी झाली होती. तर एका दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यूही झाला होता. त्यामुळे जालना रोडचे रुंदीकरण कधी होणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT