पिशोर : कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजना नदीतून श्रावण निवृत्ती मोकासे (वय १०) हा चिमुकला चार दिवसांपूर्वी वाहून गेला होता. या चिमुकल्याचा मृतदेह गुरूवारी (दि.२) सकाळी घटनास्थळापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावरील कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ आढळून आला.
सोमवारी (दि.२९) रस्त्याने जात असताना पाय घसरून श्रावण नदीत पडला होता. सलग तीन दिवस एनडीआरएफच्या पथकाने अंजना नदीसह आसपासच्या भागात त्याचा शोध घेतला, मात्र श्रावण काही मिळून आला नाही. अखेर, गुरुवारी सकाळी शेतकरी हरुन शेख व रावसाहेब निकम हे शेतात जात असताना गट क्र.११ मध्ये असलेल्या बंधाऱ्याजवळ झाडाच्या खोड व फांद्यांमध्ये अडकलेला मृतदेह त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ गावात माहिती दिल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याच्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.