स्थायी समिती सभापतीपदी अनिल मकरिये file photo
छत्रपती संभाजीनगर

स्थायी समिती सभापतीपदी अनिल मकरिये

मंत्री सावेंच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार; पाचही विषय समिती युतीकडेच

पुढारी वृत्तसेवा

Anil Makariye Appointed as Standing Committee Chairman

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेतील स्थायी समितीसह विविध विषय समितींच्या सभापतीपदासाठी गुरुवारी (दि.१२) निवडणूक पार पडली. यात स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे अनिल मकरिये यांनी एमआयएमचे अब्दुल मतीन खान यांचा पराभव केला. स्थायी समितीसह पाचपैकी चार विषय समिती भाजपच्या, तर एक समिती शिवसे-नेच्या (शिंदे गट) ताब्यात आली आहे.

स्थायी समिती सभापतीपदासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. प्रारंभी अर्जाची छाननी करण्यात आली, ज्यात मकरिये आणि मतीन खान या दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यानंतर झालेल्या मतदानात १६ सदस्यांपैकी मकरिये यांना भाजपची ८ आणि शिव-सेना शिंदे गटाची २ अशी एकूण १० मते पडली.

तर मतीन खान यांना ४ मते मिळाली. उद्धव ठाकरे गटाने तटस्थ भूमिका घेतल्याने एकूण १४ सदस्यांनीच मतदानाचा हक्क बजावला. विजयी घोषणेनंतर मकरिये यांनी सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे आणि भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले आणि शहर विकासावर भर देण्याच्या सूचना केल्या.

विषय समितींवर युतीचेच वर्चस्व

पाचही विषय समितींच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहेः

महिला व बालकल्याण समिती: भाजपच्या शोभा बुरांडे यांनी एमआयएमच्या विजयश्री जाधव यांचा पराभव केला. उपसभापतीपदी ज्योती गंगवाल निवडून आल्या.

आरोग्य समिती : भाजपच्या सुनीता साळुंके यांनी एमआयएमचे मोहम्मद वाजेद यांचा ५ विरुद्ध ३ मतांनी पराभव केला.

शहर सुधार समिती : भाजपचे रामदास हरणे ५ मते मिळवून विजयी झाले. एमआयएमचे शेख साबेर यांना ३ मते पडली.

शालेय शिक्षण समिती: शिवसेनेच्या प्रेमलता दाभाडे यांना ५ मते मिळाली, तर एमआयएमचे सय्यद उसामा यांना ३ मते पडली.

समाजकल्याण समिती भाजपचे जालिंदर शेंडगे यांनी एमआयएमच्या सुनीता वाहूळ यांचा पराभव करून विजय मिळवला. ठाकरे गटाच्या एका सदस्याने तटस्थतेची भूमिका घेतली.

मैत्रीसाठी मंत्री सावे थेट मुंबईहून मनपात

मंत्री अतुल सावे आणि नवनिर्वाचित सभापती अनिल मकरिये यांची बालपणापासूनची मैत्री सर्वश्रुत आहे. या मैत्रीखातर मंत्री सावे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून विशेषतः मुंबईहून शहरात आले होते. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही सावे यांनी मकरिये यांच्यासाठी प्रभाग पिंजून काढला होता. आपल्या मित्राला सभापतीपदी विराजमान केल्यानंतर सावे पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT