An old man's one and a half tola chain was snatched in the Satara area.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मंदिरातून पूजा करून घराकडे निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी दुचाकीस्वार दोघांनी हिसकावली. ही घटना सोमवारी (दि.३) सकाळी साडेआठच्या सुमारास भीमाशंकर कॉलनी, लोटस अपार्टमेंट, बीड बायपास भागात घडली.
फिर्यादी सुषमा राजेंद्र ब्योहार (६८, रा. फ्लॅट क्र. ३०५, लोटस अपार्टमेंट, बीड बायपास, हॉटेल निशांत पार्कमागे) यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्या मंदिरात पूजा करून भीमाशंकर कॉलनीतील रस्त्याने घराकडे पायी निघाल्या होत्या. दुचाकीस्वार दोन चोरटे त्यांच्या पुढे जाऊन काही अंतरावर थांबले.
सुषमा या दुचाकीजवळ जाताच एकाने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून तेथून पसार झाले. सुषमा यांनी आरडाओरड केल्याने लोक जमा झाले. काहींनी चोरट्यांचा पाठलाग केला. ते कॉलनीतील दुसऱ्या रस्त्याने पसार झाले होते. दुचाकीवर (एमएच-४३-२७३९) असा नंबर होता.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस, गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले करत आहेत.