पैठण : बांगलादेश येथे हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने पैठण शहरातील आज (दि.२०) दुपारपर्यंत सर्व व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कालपासूनच पैठण शहरातील विविध व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवले आहेत. या दरम्यान बंद दरम्यान हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातून जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. तर, दुपारी दोन वाजता शहरातील खंडोबा मंदिर चौकात कार्यवाहक संकल्प हिंदूराष्ट्र अभियानाचे प्रमुख कमलेश कटारीया यांच्यासह विविध मान्यवर आक्रोश मोर्चा प्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत.
पैठण शहर बंद ठेवण्याच्या निर्णयाने विविध शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गैरहजरी असल्याचे चित्र दिसून आले. या बंदमुळे राज्य महामंडळाच्या बस सेवेवर परिणाम झाला असून हिंदू सकल समाजाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून तालुका प्रशासन प्रमुख यांना देण्यात येणार आहे.
या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सपोनि सिद्धेश्वर गोरे यांनी ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.