Amravati University topped the Youth Festival!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या ३९ व्या सेंट्रल झोन युवा महोत्सवामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अव्वल क्रमांक मिळवत जेतेपद पटकावले. तर इंदोरच्या देवी अहिल्या विश्वविद्यालयाच्या संघाने उपविजतेपद मिळविले. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिने अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
एमजीएम विद्यापीठात दि. २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान सेंट्रल झोन आंतरविद्यापीठीय युवा महोत्साचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप शनिवारी थाटात पार पडला. जेएनईसी लॉन्स येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. व्यासपीठावर अभिनेते उपेंद्र लिमये, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, एआययुच्या अपर सचिव डॉ. ममता राणी अग्रवाल, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, एआययु अधिकारी डॉ. निर्मल जौरा, दीपक कुमार झा, महोत्सवाचे सचिव डॉ. शिव कदम यांची उपस्थिती होती.
पाच दिवस चाललेल्या सेंट्रल झोन युवा महोत्सवात मध्यप्रदेश, छत्तीसगडसह मराठवाडा आणि विदर्भातील २३ विद्यापीठातील ११०८ विद्यार्थी कलावंतांनी सहभाग नोंदवला. म्युझिक, डान्स, लिटररी, थेअटर आणि फाईन आर्ट्स अशा एकूण मुख्य ५ कलाप्रकारांत विविध २७ प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्यातील ७ विद्यापीठे, मध्यप्रदेश राज्यातील १३ विद्यापीठे आणि छत्तीसगड राज्यातील ३ विद्यापीठे असे एकूण २३ विद्यापीठांचा यामध्ये सहभाग होता. एकूण सत्तावीस स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या अशा एकूण ८१ स्पर्धकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
युवा महोत्सवातील विजेतेपद
सर्वसाधारण विजेतेपद - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती » सर्वसाधारण उपविजेता संघ १ देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदोर, मध्य प्रदेश » सर्वसाधारण उपविजेता संघ २ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर सर्वसाधारण उपविजेता संघ ३ इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय, खैरागढ, छत्तीसगड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड » सर्वसाधारण उपविजेता संघ ४ -जिवाजी विद्यापीठ, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश
आताची वेळ आनंदाने जगणे आवश्यक अभिनेते उपेंद्र लिमये
ज्या विद्यार्थ्यांनी या युवा महोत्सवात आपला सहभाग घेतला आहे, त्यांनी हे आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण जगले पाहिजेत. हा काळ आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ असून आताची वेळ आनंदाने जगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेते उपेंद्र लिमये यांनी यावेळी केले. माझ्या काळामध्ये युवा महोत्सवात मुलींची संख्या कमी होती मात्र, आज ती वाढलेली असल्याचे पाहून मनस्वी आनंद होत आहे. तो जो काळ होता तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता. मी आज बॉलीवूड, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये बऱ्यापैकी काम करू शकत आहे, याचे एकच कारण आहे ते म्हणजे माझी जडणघडण अशाच युवा महोत्सवात झाली असल्याचे अभिनेते उपेंद्र लिमये यांनी यावेळी सांगितले.