छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील विविध विभागांच्या कामकाजात मोठे फेरबदल करण्यात आले असून, आयुक्त अमोल येडगे यांनी रविवारी (दि.२) रात्री उशिराने हे आदेश काढले. यात नगररचना, मालमत्ता, बीओटी, गुंठेवारी, उद्यान, अग्निशमन आदी महत्त्वाच्या विभागांच्या जबाबदाऱ्यांचे फेरवाटप करण्यात आले.
काही अधिकाऱ्यांकडील विभाग काढून ते इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांकडे अतिरिक्त पदभार देण्यात आल्याने हा बदल म्हणजे केवळ खातेबदलाची मलमपट्टी असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, कामाचा मोठा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांवरच पुन्हा अतिरिक्त जबाबदाऱ्यांचा भार टाकण्यात आल्याची प्रतिक्रिया अधिकारी व कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे.
महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी महापालिकेतील विविध विभागांच्या कामकाजात मोठे फेरबदल केले. यासंदर्भातील आदेश रविवारी रात्री उशिराने जारी करण्यात आले. या आदेशानुसार नगररचना विभागाचे प्रभारी उपअभियंता म्हणून संजय चामले यांच्याकडे पुन्हा जबाबदारी देण्यात आली आहे.
उपायुक्त अपर्णा थेटे यांच्याकडील मालमत्ता आणि बीओटी विभाग काढून ते उपायुक्त विकास नवाळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. तसेच महापालिकेच्या विकासकामांच्या धनादेशांवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार उपायुक्त अभय प्रामाणिक यांच्याकडे देण्यात आले असून, उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. तसेच महापालिकेत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आणि पदोन्नतीने आलेले मनपा अधिकारी यांच्यात महत्त्वाच्या विभाग वाटपावरून अनेक वर्षांपासून नाराजी असल्याची चर्चा आहे. तर महत्त्वाची खाती प्रामुख्याने प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांकडेच सोपविली जात असल्याची भावना मनपा अधिकाऱ्यांमध्ये आहे.
तसेच अनुभवी आणि कामकाजात प्राविण्य मिळविलेल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याचाही आरोप सातत्याने होत आला आहे. या नव्या आदेशानंतर या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले असून, आयुक्त अमोल येडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच विभागप्रमुखांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठे बदल केले. त्यात मालमत्ता आणि बीओटी हे दोन्ही महत्त्वाचे विभाग उपायुक्त विकास नवाळे यांच्याकडे सोपविण्यात आल्याने प्रशासनात विविध तर्कवितर्काना उधाण आले आहे.
दुसरीकडे अपर्णा थेटे यांच्याकडे निवडणूक व जनगणना, विधी, समाज विकास, ग्रंथालय, एनयूएलएम, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, मध्यवर्ती भांडार आणि पीएमएवाय हे विभाग कायम ठेवण्यात आले आहेत.
गुंठेवारीची भावे-चामले यांच्याकडे जबाबदारी
महापालिकेत स्वतंत्र गुंठेवारी कक्ष स्थापन करण्यात आला असून, बळीराम बोंबले आणि अक्षय देशमुख यांची शाखाप्रमुख म्हणून नियुक्त्ती करण्यात आली आहे. झोन १ ते ५ मधील गुंठेवारीची जबाबदारी नगररचनाकार कौस्तुभ भावे यांच्याकडे, तर झोन ६ ते १० मधील कामकाज प्रभारी उपअभियंता संजय चामले यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
३६ मीटरपेक्षा उंच इमारतींचे प्रस्ताव आयुक्तांकडे
अग्निशमन विभागाकडून ३६ मीटरपर्यंत उंचीच्या इमारतींना नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विभागप्रमुखांकडे कायम राहणार आहेत. मात्र ३६ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरीपूर्वी आयुक्तांकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रभारी उपअभियंताकडे तीन विभागांचा पदभार
प्रभारी उपअभियंता पूजा भोगे यांच्याकडे इमारत विभागासह मालमत्ता आणि बीओटी या दोन महत्त्वाच्या विभागांचाही अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे एकाच वेळी तीन विभागांचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.
प्रामाणिक करणार धनादेशांवर स्वाक्षरी
महापालिकेच्या विविध विकासकामांच्या देयकांसाठी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांसोबत धनादेशांवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार उपायुक्त अभय प्रामाणिक यांना देण्यात आले आहेत. यापूर्वी ही जबाबदारी उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्याकडे होती.