Allegation that Manoj Jarange accepted a contract worth ₹6 crore from MLA Abdul Sattar to defame Shirsat
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा शिरसाट यांची बदनामी करण्यासाठी मनोज जरांगे यांनी आ.अब्दुल सत्तार यांच्याकडून ६ कोटीची सुपारी घेतल्याचा दावा जरांगेचे माजी सहकारी अमोल खुणे यांना केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हे आरोप म्हणजे माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचे काम सुरू असून, जरांगे यांना बदनाम करण्याचा कट असल्याचा संताप आ. सत्तार यांनी माध्यमांसमोर व्यक्त केला. हे बोगस आरोप करणारे आणि बोगस बोलणाऱ्या मूळ सूत्रधाराचा शोध तपास यंत्रणांनी तातडीने लावला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
खुणे यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना सत्तार म्हणाले, मी जरांगे पाटील यांना २५ वर्षांपासून ओळखतो. त्यांना ६ कोटी रुपयांत खरेदी करू शकेल असा कोणीही जन्मलेला नाही. स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी काही लोक इतरांवर चिखलफेक करत आहेत. ७०० कोटी आणि १४०० कोटींच्या गप्पा मारणाऱ्यांनी आयुष्यात कधी पैशांचे बंडल तरी पाहिले आहेत का? असा सवालही त्यांनी केला.
जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या खालावलेली असताना त्यांना टार्गेट केले जात असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचे काम सुरू आहे. हे बोगस आरोप करणारे, बोगस टेंडर आणि बोगस बोलणारे मूळ सूत्रधार कोण आहेत, याचा शोध शासकीय तपास यंत्रणांनी तातडीने लावला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. हे पालकमंत्री ना मला व्हायचं आहे, ना कुणाला करायचा आहे, हे जे लोक आहेत त्यांना बिनबुडाचा आरोप करायचा आहे.
वकिलांशी बोलून कायदेशीर कारवाई
संजय शिरसाट हे माझे मित्र आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत मी त्यांचा सूचक होतो. पालकमंत्री ना मला व्हायचं आहे, ना कुणाला करायचा आहे, हे जे लोक आहेत ते बिनबुडाचे आरोप करत आहे, अशा खोटारड्या लोकांना कायद्याचा हिसका दाखवण्यासाठी वकिलांशी सल्लामसलत कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचेही सत्तार यांनी सांगितले.