फर्दापूर : छत्रपती संभाजीनगरड्डजळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दापूर येथील अजिंठा घाटात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन अवजड वाहनांना किरकोळ अपघात झाल्याने तब्बल २० तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. घाटातील अरुंद, वळणदार मार्गावर दोन्ही ट्रक बंद पडून अडकल्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. परिणामी पर्यटक, विद्यार्थी, रुग्णवाहिका व इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
शुक्रवारी पहाटे घाटातील एका अवघड वळणावर मालवाहू ट्रकचा अपघात झाला होता. त्यामुळे वाहतूक काही प्रमाणात संथ झाली होती. मात्र रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या आणखी एका अवजड ट्रकचे ब्रेक निकामी झाले. चालकाने नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु ट्रक घाटातील डोंगर कठड्याला धडकून अरुंद वळणावरच आडवा अडकला. यानंतर काही मिनिटांतच दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आणि शनिवारी पहाटे महामार्गावरील वाहनांची संख्या वाढत गेल्याने कोंडीची तीव्रता अधिकच वाढली. शनिवारी सकाळपर्यंत अजिंठा लेणी ते फर्दापूर बसस्थानक परिसरापर्यंत सुमारे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी प्रवाशांना पाणी व अन्नासाठीही त्रास सहन करावा लागला.
वाहतूक सुरळीत होण्यास विलंब होत असल्याचे लक्षात येताच अनेक अवजड वाहनांनी फर्दापूरहूनच माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. तर लहान चारचाकी वाहनांनी सोयगाव, हळदा व शेंदुर्णी मार्गे छत्रपती संभाजीनगर व जळगावकडे पर्यायी मार्ग स्वीकारला. मात्र या ग्रामीण मार्गांवरही अचानक वाढलेल्या वाहतुकीमुळे काही काळ ताण निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच फर्दापूर व अजिंठा पोलिसांनी घाटात अडकलेली वाहने बाजूला करण्याचे प्रयत्न करून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र घाटातील अवघड वळणे, अरुंद रस्ता व वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांची संख्या वाढतच गेल्याने, पोलिसांना ही अडचणीचा सामना करावा लागला, शनिवारी दुपारपर्यंत पोलिसांनी घाटातील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत केल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे पुन्हा एकदा घाटातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पर्यटकांचा मोठा खोळंबा शनिवारी सकाळी अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या देश-विदेशातील पर्यटकांची वाहने वाहन कोंडीत अडकली.
अनेक खासगी प्रवासी बसचालकांना महामार्गालगतच्या धम्माचल रस्त्यावर बसेस उभ्या कराव्या लागल्या. त्यामुळे उन्हातान्हात लहान मुलांसह बसून पर्यटकांनी प्रतीक्षा केल्याचे हृदयद्रावक दृश्य दिसून आले. काही पर्यटकांनी व्यवस्थापनाबाबत नाराजीही व्यक्त केली.
पर्यटकांचा मोठा खोळंबा
शनिवारी सकाळी अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या देश-विदेशातील पर्यटकांची वाहने वाहन कोंडीत अडकली. अनेक खासगी प्रवासी बसचालकांना महामार्गालगतच्या धम्माचल रस्त्यावर बसेस उभ्या कराव्या लागल्या. त्यामुळे उन्हातान्हात लहान मुलांसह बसून पर्यटकांनी प्रतीक्षा केल्याचे हृदयद्रावक दृश्य दिसून आले. काही पर्यटकांनी व्यवस्थापनाबाबत नाराजीही व्यक्त केली.