Ajanta Caves : एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाचा पर्यटकांना फटका File Photo
छत्रपती संभाजीनगर

Ajanta Caves : एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाचा पर्यटकांना फटका

अजिंठा लेणी बस तिकिटासाठी तासंतास उन्हात रांगेत उभे राहण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

Ajanta Caves: Tourists affected by the Maharashtra State Road Transport Corporation's shoddy planning

फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीत मंगळवारी (दि. २३) पर्यटकांची तुफान गर्दी उसळली. मात्र, या गर्दीला सामोरे जाण्यासाठी एसटी महामंडळाचे नियोजन पूर्णपणे अपयशी ठरल्याने शेकडो पर्यटकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. फर्दापूर टी. पॉइंट बसस्थानकावर अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या बसच्या तिकिटासाठी पर्यटकांना तासन्तास उन्हात रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. परिणामी अनेक पर्यटकांनी अजिंठा लेणी न पाहताच माघारी फिरण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी तब्बल चार किलोमीटरचा प्रवास पायी करत अजिंठा लेणी गाठल्याचे चित्र पहायला मिळाले.

नाताळच्या सुट्ट्यांची चाहूल लागताच अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यातच मंगळवारी वेरूळ लेणी बंद असल्यामुळे सकाळपासूनच अजिंठा लेणीत पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. असे असतानाही फर्दापूर टी. पॉइंट ते अजिंठा लेणीदरम्यान बससेवा चालविणाऱ्या सोयगाव आगाराचे नियोजन पूर्णपणे ढासळल्याचे स्पष्ट झाले.

बसची संख्या अपुरी असल्याने तिकिटासाठी जवळपास पाचशे मीटरपर्यंत लांबच लांब रांग लागली . दोन-दोन तास रांगेत उभे रा-हूनही तिकीट मिळत नसल्याने पर्यटक वैतागले. एसटी ढिसाळ महामंडळाच्या नियोजनाविरोधात पर्यटकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.अनेकांनी अजिंठा लेणी न पाहताच परतण्याचा निर्णय घेतला, तर काही पर्यटकांनी पायीच प्रवास करून अजिंठा लेणी गाठली.

अपुरी व्यवस्था

विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी असतानाही सोयगाव आगाराकडून केवळ ११ बस, ६ वाहक, ११ चालक आणि १ वाहतूक नियंत्रक इतकेच तोकडे मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. या अपुऱ्या व्यवस्थेमुळे मंगळवारी अजिंठा लेणीत आलेल्या शेकडो पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

जागतिक कीर्तीच्या पर्यटनस्थळावर अशा प्रकारचे नियोजनाचे अपयश वारंवार घडत असल्याने एसटी महामंडळाने भविष्यात तरी गर्दीच्या दिवसांचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी पर्यटकांकडून जोर धरू लागली आहे.

सहलीतील विद्यार्थ्यांची हेळसांड

मंगळवारी शैक्षणिक सहलीतील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात अजिंठा लेणीत आले होते, मात्र पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे बस तिकीट मिळणे अवघड झाल्याने, अनेक विद्यार्थी थकून जाऊन खाली बसले. काही शैक्षणिक सहली या सर्व बाबीला वैतागून अजिंठा लेणी न बघताच पुढील स्थानाकडे रवाना झाल्या. या गर्दीचा येथील पोलिस यंत्रणेवर ताण निर्माण झाल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT