पर्यटकांच्या अंगात रुतलेले मधमाशांचे काटे काढून पर्यटकांना मदत करताना लेणापूर येथील नागरिक.  (छाया : सागर भुजबळ)
छत्रपती संभाजीनगर

Ajanta Caves bee attack on tourists : अजिंठा लेणीत सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला

आठ पर्यटक जखमी; सप्तकुंड धबधबा परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

फर्दापूर : अजिंठा लेणी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी आग्या मोहळाच्या मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची गंभीर घटना गुरुवारी (दि.19) दुपारी घडली. या हल्ल्यात आठ पर्यटक जखमी झाले असून, त्यापैकी दोन महिला पर्यटक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. सलग दोन दिवस मधमाशांच्या हल्ल्याच्या घटनांमुळे अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बुधवारी (दि.18) दुपारी अजिंठा लेणी क्रमांक 10 च्या परिसरात मधमाशांच्या हल्ल्यात सात जपानी पर्यटकांसह तब्बल 40 देशी-विदेशी पर्यटक जखमी झाले होते. या घटनेची धास्ती असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गुरुवारी सकाळी सिल्लोड तालुक्यातील आठ पर्यटकांचा एक समूह अजिंठा लेणीची सफर करून दुपारच्या सुमारास व्ह्यू पॉइंट येथील पिकनिक पॉइंटकडे जात होता. यावेळी लेणी परिसरातील सुप्रसिद्ध सप्तकुंड धबधबा परिसरात अचानक आग्या मोहळाच्या मधमाश्यांनी पर्यटकांच्या समूहावर जोरदार हल्ला चढवला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेले पर्यटक जंगलातील ओबडधोबड रस्त्याने आरडाओरड करत जवळील लेणापूर गावाच्या दिशेने धावत सुटले. मात्र मधमाशांनी जवळपास पाचशे मीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

ही घटना लक्षात येताच लेणापूर येथील नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने गोणपाट, चादरी व अन्य साहित्य घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पर्यटकांची मधमाश्यांच्या तावडीतून सुटका करत त्यांच्या शरीरात रुतलेले काटे काढले आणि प्राथमिक उपचार केले. या हल्ल्यात आठ पर्यटक जखमी झाले असून, त्यापैकी दोन महिला पर्यटक गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रवाना करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT