Airport expansion : विमानतळ विस्तारामुळे ८०० घरांच्या गुंठेवारीचा पेच file photo
छत्रपती संभाजीनगर

Airport expansion : विमानतळ विस्तारामुळे ८०० घरांच्या गुंठेवारीचा पेच

प्रकाशनगरातील गट ब्लॉक

पुढारी वृत्तसेवा

Airport expansion creates dilemma for 800 houses

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विमानतळ विस्तारीकरणासाठी मुकुंदवाडीतील प्रकाशनगर पूर्व व पश्चिम भागातील गट क्रमांक १३, १६ आणि १७ ब्लॉक करण्यात आल्याने या परिसरातील सुमारे ८०० घरांच्या गुंठेवारी नियमितीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने अनधिकृत भूखंड व बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिकांना शेवटची संधी दिली असतानाच गट ब्लॉक असल्याने अनेक प्रकरणे पुढे सरकत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. हा पेच सोडविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणासोबत बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी मागणी नगरसेवक मनोज गांगवे, रवी कावडे व प्रियंका खोतकर यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्याच प्रक्रियेत प्रकाशनगर परिसरातील वरील तीन गट विमानतळ प्राधिकरणाकडून ब्लॉक करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील रहिवाशांना भूखंड तसेच बांधकामे नियमित करून घेण्यात अडथळा येत आहे. मात्र महापालिकेने गुंठेवारी अधिनियमानुसार अनधिकृत भूखंड आणि बांधकामे नियमित करून घेण्यासाठी नागरिकांना शेवटची संधी दिली आहे.

त्यासोबत मोठ्या सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रकाशनगरातील नागरिकांकडून नियमितीकरणासाठी प्रतिसाद मिळत असताना गट क्रमांक ब्लॉक असल्यामुळे अनेक प्रकरणांची प्रक्रिया रखडल्याचे नगरसेवकांनी विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तसेच गट ब्लॉक करण्यामागे विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याने तो विचारात घेऊन ज्या मालमत्तांना गुंठेवारीचा लाभ देणे शक्य आहे, अशा प्रकरणांचा स्वतंत्रपणे विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या परिसरातील नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देतानाच नियमितीकरणाचा मार्गही खुला करावा, अशी मागणी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे करण्यात आली आहे.

या प्रश्नावर अनेक वर्षांपासून तोडगा निघालेला नसल्याने विमानतळ प्राधिकरण, विभागीय प्रशासन आणि महापालिका यांच्यात समन्वयाने निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

लवकरच बैठक

विमानतळ प्राधिकरणासोबत बैठक घेण्यास विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी तयारी दर्शविली आहे. लवकरच बैठक आयोजित करून प्रकाशनगरातील गुंठेवारी नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे नगरसेवक रवी कावडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT