Agarwal connection in Qureshi's ration racket
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गरीब आणि सर्वसामान्यांच्या हक्काचे रेशनचे धान्य काळ्याबाजारात विकून कोट्यवधींची माया जमवणाऱ्या कलीम कुरेशीच्या रॅकेटमध्ये आता एक मोठे नाव समोर आले आहे. करोडी येथील 'गजानन अॅग्रो सेल्स कॉर्पोरेशन'चा मालक संजय भगीरथमल अग्रवाल (रा. अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) आणि त्याचा व्यवस्थापक मतीनुद्दीन गजनफरुद्दीन काझी (रा. सवेरा पार्क, हर्मूल) या दोघांचाही या महाघोटाळ्यात सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. कलीम कुरेशी हा रेशनचे धान्य स्वस्तात खरेदी करून ते थेट अग्रवालच्या कंपनीत काळ्याबाजाराने विकत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या धान्य तस्करी प्रकरणात गुन्हे शाखेने २१ जुलै रोजी कारवाई करत समीर बाबर कुरेशी (३०), फरदीन गणी पठाण (२५, दोघे रा. चिकलठाणा) आणि फहद अहेमद लईक अहेमद शुत्तारी (४५, रा. किराडपुरा) या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार कलीम छोटू कुरेशी, आवेज कुरेशी, शेख अजहर शेख चांद कुरेशी याच्यासह गजानन अॅग्रोचा मालक संजय अग्रवाल आणि मॅनेजर मतीनुद्दीन हे पाचही जण फरार असून, त्यांचा कसून शोध घेत आहेत.
कलीम कुरेशी याने किराडपुऱ्यातील रहेमानिया कॉलनीमध्ये एका गोदामात रेशनच्या धान्याचा मोठा अवैध साठा लपवून ठेवला होता. १२ जूनच्या रात्री हा साठा ट्रकमधून काळ्याबाजारात विक्रीसाठी नेला जाणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने गोदामावर छापा मारला. या कारवाईत गहू, तांदूळ, साखर, मका आणि ज्वारीच्या तब्बल ४८७ गोण्या आणि ट्रक असा एकूण १५ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्याच्याच बाजूला असलेल्या एका गोदामात पोषण आहारचाही माल मिळून आला होता. याप्रकरणी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप शिंदे आणि बालविकास अधिकारी गणेश पुंगळे यांच्या फिर्यादीवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता तपासाअंती या गुन्ह्यात फसवणुकीचे कलम वाढवण्यात आले आहे.
अग्रवालचा जुनाच 'कारनामा'
रेशनचा काळाबाजार करणारा 'गजानन अॅग्रो'चा मालक संजय अग्रवाल हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील जुनाच आरोपी आहे. यापूर्वी तत्कालीन पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाने अग्रवालच्या गोदामावर छापा मारून पर्दाफाश केला होता. त्यावेळी अग्रवाल, मतीनुद्दीन काझी, बलवंतसिंग चौहान आणि रोहित सिंग या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.