Sambhajinagar News : पाडापाडीनंतर मुकुंदवाडी रोडवर अद्यापही अंधारच अंधार  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : पाडापाडीनंतर मुकुंदवाडी रोडवर अद्यापही अंधारच अंधार

पथदिवे बंद : वाहनधारकांचा एकमेकांच्या हेडलाईट्सवर प्रवास

पुढारी वृत्तसेवा

After Encroachment campaign Mukundwadi Road is still dark

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुकुंदवाडी भागात एका खुनाच्या घटनेनंतर महापालिकेने पोलिस प्रशासनाच्या मदतीने या रोडवरील मालमत्ता पाडल्या. हे अतिक्रमण हटवल्यानंतर प्रशासनाकडून मोठा गाजावाजा करत रस्ता मोकळा झाला. वाहतूक सुरळीत होईल, असे फोटोसेशन करून श्रेय घेतले. मात्र छोटी मोठी दुकाने काढून टाकल्यामुळे गजबज तर गायब झाली. मात्र त्याचवेळी या मार्गावरील उजेडही संपला. आता या रस्त्यावर वाहनधारकांना समोरील मार्ग दिसावा म्हणून एकमेकांच्या गाड्यांच्या हेडलाईट्सवर विसंबून प्रवास करावा लागत आहे.

शहर रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने सर्वात आधी शहराची जीवन वाहिनी असलेल्या जालना रोडवरील मुकुंदवाडी भागातील दुकाने जुन महिन्यात पाडली. त्यावेळी रस्ता मोठा झाला तर वाहतूक सुरळीत होईल, असे सांगण्यात आले. मात्र अतिक्रमण हटवल्याच्या सुमारे तीन महिन्यांनंतरही या ठिकाणची परिस्थिती जैसे थेच आहे. या कारवाईनंतर नागरिकांच्या वाटेला काळोख, खड्डे आणि जीवघेणा प्रवास आला आहे.

या भागातील दुकाने, छोटे छोटे गाळे मनपाकडून हटवण्यात आली. त्यामुळे या ठिकणची गजबज तर गायब झाली. पण त्याचवेळी या ठिकाणचा उजेडही संपला. स्मार्ट सिटी, पथदिवे, प्रकाशयोजना अशावर कोट्यवधींचा निधी खर्च करूनही प्रत्यक्षात या भागातील दिवे बंदच आहेत. वीज वितरण कंपनी आणि महापालिका दोघेही जबाबदारी ढकलण्यातच वेळ मारून नेत आहेत. पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडले असून, त्यात पाणी साचले आहे. त्यातच रस्त्यावर पसरलेला काळोख अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.

दरम्यान, या रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे एवढे सोपे होते, मग पथदिवे लावणे कठीण आहे का? असा सवाल आता स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळी गाड्यांच्या दिव्यांनी झगमगाट दिसतो खरा, पण हा झगमगाट म्हणजे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टाकलेले झाकण असल्याचे चित्र आहे. अतिक्रमणाच्या पाडापाडीनंतरही जालना रोडवर अंधाराचे साम्राज्य हीच याठिकाणाची सत्यता आहे. या अंधारात नागरिकांच्या जिवाशी चाललेला खेळ हे प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे जिवंत उदाहरण ठरत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT