E-Buses File Photo
छत्रपती संभाजीनगर

E-Buses : २ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिकेत १० ई-बस दाखल

करार रद्दच्या इशाऱ्यानंतर ओलेक्ट्राची हालचाल : उर्वरित २४ बस दोन आठवड्यांत येणार

पुढारी वृत्तसेवा

After a two-year wait, 10 e-buses finally arrive at the Municipal Corporation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी ओलेक्ट्रा कंपनीकडून मागविण्यात आलेल्या ३५ ई-बसपैकी अखेर १० बस महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या. बस पुरवठ्यात सातत्याने होत असलेल्या विलंबामुळे महापालिकेने करार रद्द करण्याचा इशारा दिल्यानंतर कंपनीने हालचाली गतिमान केल्या. उर्वरित २४ बस पुढील दोन आठवड्यांत मिळण्याची शक्यता असून, १७ सप्टेंबरला ३४ बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याची माहिती बुधवारी (दि. १९) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांना दिली.

शहरातील वाढती वाहतूक आणि प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन स्मार्ट सिटी प्रशासनाने इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी हैदराबादस्थित ओलेक्ट्रा कंपनीसोबत ३५ ई-बसचा करार करण्यात आला. करारानंतर कंपनीने सुरुवातीला केवळ एक बस उपलब्ध करून दिली. वातानुकूलित ई-बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर उर्वरित बस तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

मात्र, प्रत्यक्ष बस देण्याऐवजी कंपनीकडून दोन वर्षे आश्वासनेच मिळत राहिली. दरम्यान, स्मार्ट सिटी प्रशासनाची मुदत संपल्यानंतर शहर बससेवेची जबाबदारी महापालिकेकडे आली. प्रलंबित ई-बस मिळविण्यासाठी मनपानेही कंपनीकडे पाठपुरावा सुरू ठेवला. वारंवार प्रयत्न करूनही बस उपलब्ध होत नसल्याने अखेर महापालिकेने करार रद्द करण्याचा इशारा दिला. त्यानंतर कंपनीकडून बुधवारी १० बस महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्या. दाखल झालेल्या १० बसची सध्या पासिंग प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. उर्वरित २४ बस प्राप्त झाल्यानंतर एकूण ३४ ई-बस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे नियोजन आहे.

१७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बससेवेचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

२०१८ मध्ये १०० डिझेल बस

स्मार्ट सिटी प्रशासनाने २०१८ मध्ये सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून १०० डिझेल बस खरेदी केल्या होत्या. या बसमुळे शहरातील बससेवेला मोठी चालना मिळाली. मात्र, इंधनाचा वाढता खर्च आणि प्रदूषणाचा विचार करून त्यानंतर इलेक्ट्रिक बससेवेकडे वळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातूनच ओलेक्ट्रासोबत ३५ ई-बसचा करार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT