तोतया आयएएस महिलेचे अफगाण, पाक कनेक्शन ? File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : तोतया आयएएस महिलेचे अफगाण, पाक कनेक्शन ?

विविध खात्यांमधून आले ३२ लाख; आयबी, एटीएसकडून चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

Afghan, Pakistani connection of the impersonating IAS woman?

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बोगस आयएएस निवडीची यादी, खाडाखोड केलेल्या आध-ारकार्डचा वापर करून हॉटेल अॅम्बेसेडरमध्ये तब्बल सहा महिने मुक्काम ठोकणाऱ्या कल्पना भागवतचे अनेक खळबळजनक कारनामे समोर येत आहेत. ड्रायफ्रूटचा भागवत व्यापार करणारा अफगाणिस्तानचा अशरफ खलील या मित्रामार्फत तिला आर्थिक रसद पुरवली जात असल्याचे समोर येत आहे. ही बाब समोर येताच तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. कल्पनाची आयबी, एटीएस, सीआयडी, एसआयडी या तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.१७) कसून चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

अशरफ सहा महिन्यांपूर्वी शहरात येऊन गेला. तेव्हा दोघांची भेट झाल्यानंतर ती हॉटेलात मुक्कामासाठी गेली. अशरफचा भाऊ पाकिस्तानात असून, त्याच्या भारतात येण्याच्या व्हिसाची कागदपत्रे तिच्या मोबाईलमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. देशविघातक कृत्यासाठी तिचा वापर केला जात होता का? याबाबत यंत्रणा तपास करत असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.

कल्पना भागवत सहा महिन्यांपासून हॉटल अॅम्बेसेडरमध्ये संशयास्पदरीत्या राहत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या सूचनेनुसार हसूल ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार, सहाय्यक निरीक्षक अरुणा घुले, वर्षा काळे व पथकाने शनिवारी (दि. २२) रात्री तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आधारकार्डवर खाडाखोड, बोगस आयएसएसच्या यादीत स्वतःचे नाव, नियुक्तीपत्र आढळून आले.

तिला न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सोमवारी डीसीपी प्रशांत स्वामी, पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी तिची कसून चौकशी केली. प्रभारी पोलिस आयुक्त मिश्र यांनी अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली. त्यानंतर तपास अधिकारी एपीआय योगेश गायकवाड, जमादार दीपक देशमुख, संदीप जाधव, अविनाश पांढरे महिला अंमलदार पूर्णपात्रे यांनी कल्पनाला पडेगाव येथील फ्लॅटमध्ये नेऊन घरझडती पंचनामा केला. तत्पूर्वी नागपूर येथून आलेले गुप्तचर यंत्रणाच्या (आयबी) अधिकाऱ्यांनी दुपारी तीन वाजता सिडको पोलिस ठाण्यात कल्पनाची तासभर चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

अशरफ आला होता शहरात

काही महिन्यांपूर्वी एसएफएस मैदानावर एक भव्य प्रदर्शन भरले होते. या ठिकाणी अशरफने त्याचा ड्रायफूटचा स्टॉल लावला होता. तेव्हा कल्पना त्याला भेटल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतरच तिने हॉटेलात मुक्काम हलविला असावा, असा अंदाज आहे. तत्पूर्वी कल्पना शहरातच दुसरीकडे राहत होती, मात्र याचाबत ती काहीही बोलत नसल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.

त्यानंतर कल्पना व त्यांची आई दोघीच चिनार गार्डन येथील सी १३ क्रमांकाचा १ बीएचके फ्लॅटमध्ये राहत होत्या. मात्र २०२० साली तिने फ्लॅट सोडून दिला. तेव्हापासून तिथे कोणीच राहत नाही. तिने केवळ सेल डिड जमा करून उर्वरित कागदपत्रे सोसायटीकडे जमा केलेली नाहीत.

पाकिस्तानच्या अबिदच्या व्हिसाची मोबाईलमध्ये कागदपत्रे

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना काही वर्षांपूर्वी दिल्लीत यूपीएससीची तयारी करत होती. तेव्हा तिची अफगाणिस्तानच्या अशरफ खलील याच्यासोबत ओळख झाली. अशरफ दिल्लीत ७ वर्षांपासून राहतो. त्याला सहा भाऊ असून, त्याचा एक भाऊ पाकिस्तानमध्ये राहत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये राहणारा अबिद याने भारताचा व्हिसा मिळविण्यासाठी अर्ज केल्याची कागदपत्रे कल्पनाच्या मोबाईलमध्ये सापडल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाईलमध्ये अनेक नेत्यांसोबत फोटो

नेत्यांसोबतचे फोटो आढळून आले. तसेच मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांसह उच्चपदस्य अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर मिळून आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोबत एआयने तयार केलेले फोटो सापडले आहेत. ती लोकांना तुमची अडलेली सरकारी कामे करून देते, असे सांगून मध्यंतरी लायझनिंगची कामे करत होती, असेही तपासात समोर आले आहे. अनेक खासदार, आमदारांचे बोगस लेटरहेडही तिच्याकडे आढळून आल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT