मतदार याद्यांवरील हरकती तपासण्यासाठी प्रशासक रस्त्यावर File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : मतदार याद्यांवरील हरकती तपासण्यासाठी प्रशासक रस्त्यावर

प्रभागनिहाय नागरिकांशी संवाद

पुढारी वृत्तसेवा

Administrators on the streets to check objections on voter lists

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळच घोळ झाला आहे. जवळपास सर्वच प्रभागांतील मतदारांच्या नावांची एकातून दुसऱ्या प्रभागात पळवापळवी झाली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातून ओरड होत आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत शुक्रवारी (दि.२७) प्रशासक जी. श्रीकांत हे रस्त्यावर उरतले आहेत. त्यांनी रशीदपुरा, गणेश कॉलनीतून प्रत्यक्ष स्थळपाहणी आणि पंचनामा करून मतदारांशी संवाद साधत आक्षेप जाणून घेतले.

महापालिका निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादीचा आधार घेत प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार केल्या. या याद्या २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. या २९ प्रभागांच्या मतदार याद्या प्रत्येक झोन कार्यालयांसह महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. याद्यांची तपासणी केल्यानंतर आपले नाव तर दुसर्याच याद्यांमध्ये दिसत असल्याची ओरड मतदारातून सुरू झाली. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल शेकडो नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचा प्रकार पुढे आला. त्यावरून मतदारांसह इच्छुक नगरसेवकांतून ओरड सुरू झाली. प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते महापालिकेत येऊन अधिकाऱ्यांशी वाद घालत आहेत.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी हे जाणूनबुजून केले, असा आरोपही शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला. या आरोपांना गांभीर्याने घेत प्रशासक जी. श्रीकांत हे शुक्रवारी स्वतः रस्त्यावर उतरले. त्यांनी रशीदपुरा, गणेश कॉलनी या वसाहतीतून पंचनाम्यांना सुरुवात केली. नागरिकांशी प्रत्यक्षात संवाद साधत त्यांनी तक्रारी जाणून घेतल्या.

त्यांच्यासमवेत प्राधिकृत अधिकारी, प्रगणक हे देखील होते. मतदारांनी दाखल केलेल्या हरकतींची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून मतदार यादीमध्ये झालेल्या घोळाची माहिती घेतली. या प्रभागातील सहाशे मतदार दुसऱ्या प्रभागात गेल्याचे मतदारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी तातडीने मतदार यादी दुरुस्त करण्याचे आदेश संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्याना दिले.

सकाळ, दुपार, संध्याकाळ आढावा घ्या

प्रत्येक प्राधिकृत अधिकारी यांना सक्त सूचना करीत प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, आक्षेपांची स्वतः पडताळणी करणे आणि प्रगणकाकडे पाठपुरावा करून त्यांच्याकडून अहवाल घेणे अपेक्षित आहे. प्रत्येक प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सकाळ, दुपार आणि संध्याकाळी बैठका घेऊन आढावा घ्यावा.

आक्षेप येताच स्थळपाहणी करा

ज्या दिवशी आक्षेप दाखल होताच प्रभागात जाऊन त्यांची स्थळपाहणी करा, तसेच संबंधितांच्या तक्रारी जाणून घ्या. आक्षेप योग्य आहे की नाही, त्याचा पंचनामा करून निर्णय घ्या आणि आक्षेपांची दुरुस्ती करा, असे आदेश प्रगणकांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT