आरोपी अंबादास मानकापे आणि सुनील पाटील pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : घोटाळेबाज मानकापेने आदर्शच्या स्टाफ ग्रॅच्युईटी फंडातून परस्पर भरली २६ लाखांची स्टॅम्प ड्युटी

डोंगरगाव येथील जिनिंग खरेदीतील बोगसगिरी उघड; अंबादास मानकापेसह मुलगा सुनीलला अटक

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आदर्श पतसंस्थेतील २०२ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अंबादास आबाजी मानकापे (सध्या जामिनावर) याच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. डोंगरगाव (ता. फुलंब्री) येथील एक थकीत जिनिंग कॅनरा बँकेकडून खरेदी करताना मानकापे पिता-पुत्राने मोठा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या खरेदीसाठी लागणारी तब्बल २६ लाख २६ हजारांची स्टॅम्प ड्युटी मानकापेने चक्क आदर्श महिला नागरी सहकारी बँकेच्या स्टाफ ग्रुप ग्रॅच्युईटी फंडमधून परस्पर वळवून भरल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी जिनिंगच्या मूळ मालकीण जयश्री विष्णू गाडेकर (७१) यांच्या फिर्यादीवरून अंबादास आबाजी मानकापे, त्याचा मुलगा सुनील अंबादास पाटील, आदर्श महिला बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक आणि कॅनरा बँकेचे अधिकारी यांच्यावर सोमवारी (दि. २८) जिन्सी पोलिस ठाण्यात फसवणूक, अपहार आणि संगनमत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मानकापे पिता पुत्रांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक भंडारे यांनी मंगळवारी (दि. २९) दिली.

फिर्यादीनुसार, गाडेकर कुटुंबाची डोंगरगाव येथे गाडेकर जिनिंग अँड प्रेसिंग नावाची संस्था होती. त्यांनी जालना रोडवरील कॅनरा बँकेच्या शाखेतून घेतलेले सुमारे १ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज थकीत झाल्याने बँकेने सरफेसी अॅक्टनुसार कारवाई सुरू केली होती. त्यावेळी जिनिंगच्या जागेचे शासकीय मूल्य ६ कोटी ५६ लाख ४३ हजार रुपये होते. ही जिनिंग विकत घेण्यासाठी मानकापे पिता-पुत्राने गाडेकर कुटुंबासोबत ७ कोटी रुपयांना व्यवहार ठरवला होता. मात्र, मानकापेने कॅनरा बँकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून ही कोट्यवधी रुपयांची जिनिंग अवघ्या २ कोटी ११ लाख रुपयांत आदर्श जिनिंग अँड प्रेसिंग प्रा. लि.च्या नावाने खरेदी केली.

याप्रकरणी सोमवारी (दि. २८) जिन्सी पोलिस ठाण्यात अंबादास मानकापे, सुनीत पाटील, आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक आणि कॅनरा बँकेचे अधिकारी व इतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे हे करत आहेत.

कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर मारला डल्ला

धक्कादायक बाब म्हणजे, या खरेदीसाठी लागणारी २६ लाख २५ हजार ८०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी मानकापेने आदर्श महिला नागरी सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या स्टाफ ग्रुप ग्रॅच्युईटी फंडचा वापर केला. ६ नोव्हेंबर २०२० रोजी बँक व्यवस्थापकाशी संगनमत करून या फंडातून परस्पर पे-ऑर्डर काढून हा पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वळवला. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांवरून गाडेकर कुटुंबाने हा सर्व घोटाळा उघडकीस आणला.

आतापर्यंत सुमारे ७ गुन्हे दाखल

अंबादास मानकापे याच्याविरुद्ध आदर्श समूहात कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी शहरातील सिडको, वेदांतनगर येथे गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध सुमारे ७ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन महिन्यापूर्वीच मानकापे जामिनावर बाहेर आला होता. आता पुन्हा जिनिंगच्या प्रकरणात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

संस्थेच्या नावात बोगसगिरी

विशेष म्हणजे, सुनील पाटील याने आदर्श जिनिंग अँड प्रेसिंग प्रा. लि. या कंपनीच्या नावाने स्टॅम्प ड्युटी आणि विक्री प्रमाणपत्र मिळवले, परंतु प्रत्यक्षात दस्त नोंदणी करताना ही नोंदणी सह दुय्यम निबंधक क्रमांक ४ येथे आदर्श जिनिंग अँड प्रेसिंग या भागीदारी संस्थेच्या (आरोसीकडे नोंदणी न करता) नावाने करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT