Activists heavy rain subsidy Paithan
चंद्रकांत अंबिलवादे पैठण : पैठण तालुक्यातील विविध महसूल मंडळांसह पैठण शहरात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्याने खरिपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. आपल्या वतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांचे कार्यकर्ते तहसील कार्यालयात अंतिम यादी तयार करण्यासाठी लुडबूड करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यात सलग मुसळधार पाऊस सुरू असल्याने व अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केल्यानंतरही जलसंपदा विभागाने या इशाऱ्याला ठेंगा दाखवत नाथसागर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन चुकीच्या पद्धतीने राबविल्याने अचानक गोदावरी नदीत सोडलेले पाणी थेट नागरिकांच्या वस्तीत शिरल्यामुळे घरांची पडझड होऊन हजारो कुटुंबीयांचा मध्यरात्री संसार वाहून गेल्याचे दुःख आजही मनात आहे. यासह शेतकऱ्याची मुसळधार पावसाने पैठण तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन भुईसपाट होऊन पीक फळबाग खरडून गेली. राज्य शासनाच्या वतीने बाधित कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे अनुदान देण्याची घो षणा केलेली आहे.
यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी तहसीलदार ज्योती पवार यांना आदेश देऊन तात्काळ महसूल पथकाकडून पाहणी पंचनामा करण्याच्या सूचना दिल्याने तहसील विभागाकडून युद्धपातळीवर पंचनामा करण्यात आलेले आहे. परंतु नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही पुढारी समर्थकांनी अनुदान यादीत आपल्या मर्जीतील लाभार्थी असावा यासाठी दिवसभर तहसील कार्यालयात अधिकारी-कर्मचारी यांच्या बाजूच्या खुर्चीवर बसून महसूल कामात लुडबूड सुरू केल्याचे प्रकार निदर्शनास येत असून, यामुळे खरे लाभार्थी अनुदान व धान्य वाटपापासून वंचित राहण्याची भीती बाधित नागरिकांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पैठण तहसील कार्यालयातील विविध महसूल विभागातील अधिकृत शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या ऐवजी बाहेरची व्यक्ती दररोज कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत पूर्ण दिवस वावरत असून, शासकीय कामात लुडबूड करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने यासंदर्भात चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी दिली आहे.