Action taken against 15,000 passengers for free travel on railways
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : रेल्वेने प्रवास करताना सर्वांनी तिकीट काढूनच प्रवास करावा अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र असे असतानाही अनेकजण सर्रासपणे विनातिकीट प्रवास करत आहेत. रेल्वे विभागाने ऑक्टोबर महिन्यात विशेष मोहीम राबवून सुमारे १५ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे ९२ लाखांचा दंड वसूल केला आहे.
सण उत्सव काळात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने या संधीचा फायदा घेत अनेक फुकट विविध मार्गांवर प्रवास करतात. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने ऑक्टोबर महिन्यांत विशेष मोहीम राबवून एका महिन्यांत तब्बल १५ हजार ७५९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली. यात प्लॅट फॉर्म तिकिटांचाही समावेश आहे.
तिकीट काढूनच करावा प्रवास
रेल्वेने प्रवास करताना सर्वांनी तिकीट काढूनच प्रवास करावा. अशा सूचना वारंवार देऊनही अनेकजण याकडे दुर्लक्ष करत आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने रेल्-वेने आता ही कारवाई नियमित सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे.
९२ लाखांचा दंड
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना रेल्वे विभागाने चांगलाच धडा शिकवला आहे. ऑक्टोबर महिन्यात धडक कारवाई करत महिनाभरात सुमारे १५ हजार ७५९ जणांकडून तब्बल ९२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.