Action against unruly drivers in Gangapur
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर शहरासह तालुक्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर गंगापूर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कठोर भूमिका घेत विशेष मोहीम राबविली.
सोमवार आणि मंगळवारी सलग दोन दिवस चाललेल्या या मोहिमेत हेल्मेट न वापरणे, ट्रिपल सीट प्रवास, विनालायसन्स वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ९४ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईतून पोलिसांनी तब्बल १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल केला. जिल्ह्यात अलीकडच्या काळात घडलेल्या अनेक प्राणघातक अपघातांचा आढावा घेताना हेल्मेटचा वापर न करणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, राँग साईडने वाहन चालविणे, तसेच स्टंटबाजी यासारखी कारणे समोर आली होती. या गंभीर बाबींची दखल घेत पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्याच्या वतीने ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
मोहिमेदरम्यान पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, विविध मार्गावरील गर्दीची ठिकाणे आणि अपघातप्रवण भागांमध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. या तपासणीत विनाहेल्मेट वाहन चालविणारे ५८, ट्रिपल सीट प्रवास करणारे २२, विनालायसन्स वाहन चालविणारे ३, फॅन्सी नंबर प्लेट वापरणारा १, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणारे ४, तसेच इतर विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे एकूण २४ प्रकरणे नोंदविण्यात आली.
या मोहिमेत पहिल्या दिवशी ५६ हजार ५०० रुपये, तर दुसऱ्या दिवशी ५२ हजार ५०० रुपये असा एकूण १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतुक नियमभंग करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड, सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल झाजुर्णे, पोलिस उपनिरीक्षक झोरे आणि त्यांच्या पथकाने केली.
वाहनचालकांना पोलिसांचे आवाहन
वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा, वेगमर्यादचे पालन करावे, राँग साईडने वाहन चालवू नये तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे कायद्याने गुन्हा आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन जीवितहानी टाळता येईल, असे आवाहन नागरिकांना पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी केले आहे.