Sambhajinagar bribery case pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar bribery case : ३०० रुपयांची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिकेला माजी विद्यार्थ्याने शिकविला धडा

लाखभर पगार तरीही पैशाचा मोह! होली क्रॉस शाळेत एसीबीची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : माजी विद्यार्थ्याला प्रवेश निर्गम उतारा देण्यासाठी ३०० रुपयांची लाच स्वीकारताना छावणी भागातील होली क्रॉस मराठी हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.९) करण्यात आली. मारिया जोस एस्तीबेरो (५२, रा. कॉन्व्हेंट रूम नं. ३४, लक्ष्मी कॉलनी) असे लाच घेणाऱ्या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. गलेलठ्ठ पगार असताना केवळ ३०० रुपयांसारख्या क्षुल्लक रकमेसाठी एका मुख्याध्यापिकेने लाचेचा हात पुढे केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अधिक माहितीनुसार, ४८ वर्षीय तक्रारदार हे वकील आहेत. त्यांनी छावणी येथील होली क्रॉस मराठी हायस्कूलमध्ये पूर्वी शिक्षण घेतले आहे." सध्या निवडणूक आयोगाची मतदारयाद्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) मोहीम सुरू असल्याने त्या कामासाठी त्यांना प्रवेश निर्गम उताऱ्याची आवश्यकता होती. त्यासाठी ते शाळेत गेले.

मुख्याध्यापिका मारिया एस्तीबेरो यांची भेट झाली. त्यांनी अर्ज दिल्यानंतर दाखला देण्यासाठी मुख्याध्यापिकेने ५०० रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने तुम्ही आधी अर्ज तर घ्या, अशी विनंती केली असता, अर्ज आणि ५०० रुपये एकत्रच आणून दे, असा दम मुख्याध्यापिकेने भरला. त्यामुळे तक्रारदाराने सुरुवातीला दाखल्याचा अर्ज आणि इतर कागदपत्रे स्पीड पोस्टाने शाळेत पाठवून दिली. त्यानंतर ७ एप्रिलला एसीबीचे कार्यालय गाठून तक्रार नोंदवली होती.

एसीबीने ८ एप्रिल रोजी शाळेत पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. त्यात मुख्याध्यापिकेने ५०० रुपये स्वीकारण्यास मान्य केले होते. ही कारवाई एसीबीच्या पोलिस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, तपास अधिकारी वाल्मीक कोरे आणि त्यांच्या पथकातील हवालदार राजेंद्र नंदिले, सचिन बारसे, अंमलदार आशा कुंटे व चांगदेव बागुल यांनी केली.

अन् मॅडम जाळ्यात अडकल्या

पडताळणीनंतर एसीबीच्या पथकाने गुरुवारी (दि.९) शाळेतच सापळा रचला. तक्रारदाराने लाचेची रक्कम मुख्याध्यापिकेच्या हातात दिल्यानंतर डोळ्यांचा चष्मा काढून तो रुमालाने पुसून ठरलेला इशारा एसीबीला दिला. पथकाने मुख्याध्यापिकेला ३०० रुपयांच्या लाचेसह कॅबिनमध्येच रंगेहाथ पकडले. याप्रकरणी छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT