Abhijit Deepke's success filled his parents' hearts with pride!
सचिन जिरे
छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. "आता तो आमचा राहिला नाही, तर तो देशाचा झाला आहे," अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अमेरिकेतील तब्बल तीन मोठ्या नोकऱ्या नाकारून आंदोलनाची वाट निवडणाऱ्या अभिजितच्या उपोषणाच्या काळात आपला प्रत्येक क्षण भीतीमध्ये गेल्याची खंतही आई अनिता दीपके आणि वडील भगवान दीपके यांनी व्यक्त केली. त्याच्या बालपणापासूनचा संघर्ष, अमेरिकेतील नोकरी सोडून देशासाठी केलेला त्याग आणि यशाचा प्रवास उलगडताना त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.
उपाशी राहू न शकणाऱ्या मुलाचे उपोषण भगवान दीपके यांनी सांगितले की, "अभिजितने घेतलेल्या अथक मेहनतीचे अखेर फळ मिळाले असून, आंदोलन यशस्वी झाल्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. हा प्रवास अत्यंत कठीण होता. लहानपणापासून अभिजितला उपाशी राहणे अजिबात जमत नव्हते. वेळेवर जेवण मिळाले नाही तर तो अस्वस्थ व्हायचा. त्यामुळे तो अनेक दिवस उपोषण करत असल्याचे पाहून आमचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता." अभिजित अत्यंत साधा असून, गरिबांचे दुःख त्याला पाहवत नाही. कोरोनाकाळातही त्याने अनेक गरजूंना अन्नवाटप केले होते. दुसऱ्यांसाठी जगण्याची त्याची वृत्ती लहानपणापासूनच होती, अशी आठवण त्यांनी सांगितली.
अमेरिकेतील नोकऱ्यांवर पाणी अन् अण्णा हजारेंचा प्रभाव
अभिजितला अमेरिकेतील एका जाहिरात कंपनीकडून चांगल्या पगाराच्या तीन नोकऱ्यांच्या ऑफर होत्या. मात्र सोशल मीडियावर एका पोस्टनंतर काही जणांनी "अमेरिकेत राहून भारताबद्दल बोलू नको," अशी टीका केली. ही बाब त्याच्या मनाला लागल्याने त्याने त्या नोकऱ्या धुडकावून भारतात परतण्याचा आणि आंदोलनात स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, आठवीत अवघ्या १३ वर्षांचा असतानाच तो अण्णा हजारेंच्या आंदोलनाने प्रचंड प्रभावित झाला होता. तेव्हाच 'मी पण अण्णा हजारे' अशी टोपी घालून मित्रांसोबत रॅली काढत त्याने समाजासाठी काही तरी करण्याची जिद्द उराशी बाळगली होती.
राजीनामा घेतल्याशिवाय परत येणार नाही
आई अनिता दीपके यांनी सांगितले की, अभिजितने दहावीत खेळाचे अतिरिक्त गुण न घेता ९६ टक्के मिळवले होते. तो क्षण आणि आज आंदोलनाला यश मिळाल्याचा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचे क्षण आहेत. आंदोलनादरम्यान गर्दीत त्याच्या जीवाला काही होईल, अशी सतत भीती वाटायची. काल दिवसभर रडू आवरत नव्हते. त्याला घरी बोलावले असता, "राजीनामा घेतल्याशिवाय परत येणार नाही. आता मी फक्त घराचा नाही, देशाचा आहे," असा ठाम शब्द त्याने दिला. त्याच्या याच निर्धारामुळे आम्हीही त्याच्या पाठीशी उभे राहिलो. रात्री त्याच्याशी बोलणे झाल्यावर आणि त्याने औषधे सुरू असल्याचे सांगितल्यावर मनाला दिलासा मिळाला. सुरुवातीला काळजी वाटत असली तरी आज तो देशभरातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला असून, तो देशासाठी चांगले काम करू शकतो, असा सार्थ अभिमान पालकांनी व्यक्त केला.
कोण आहे अभिजित दीपके ? (जीवनप्रवास)
जन्म आणि बालपण : २९ सप्टेंबर १९९६ रोजी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जन्म. वडिलांच्या नोकरीमुळे पहिली ५ वर्षे नंदुरबारमधील धडगाव येथे वास्तव्यास. शालेय शिक्षण : २००१ मध्ये वडिलांची वाळूज (संभाजीनगर) येथे बदली. बजाजनगर येथील अल्फोन्सा इंग्रजी शाळेत केजी ते दहावीपर्यंतचे शिक्षण, अकरावी-बारावी एसबी महाविद्यालयातून पूर्ण.
उच्च शिक्षण : पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश (नंतर ते अर्धवट सोडले). त्यानंतर पुण्यातील टिळक विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण. राजकीय आणि परदेशी प्रवास: २०१९-२०२० या काळात 'आप' पक्षाच्या सोशल मीडियाचे काम पाहिले. अमेरिकेतील शिक्षण: २०२३ मध्ये 'पब्लिक रिलेशन'मध्ये एम. एस. करण्यासाठी अमेरिकेत गेला व २०२६ मध्ये शिक्षण पूर्ण केले. १६ मे २०२६ च्या पदवीदान समारंभाला न जाता त्याने आपली पदवी ऑनलाईन मिळवली.