

Jayakwadi's backwaters set the Shivna River gushing
ढोरेगाव, पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी शिवना नदीमार्गे सोलेगाव शिवारात दाखल झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीपात्र कोरडे पडू लागल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, नदीत पुन्हा पाणी आल्याने शेतीला नवसंजीवनी मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
सोलेगाव आणि परिसरातील सुमारे ७० टक्के शेतकरी ऊस पिकासाठी शिवना नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. नदीत पाणी पोहोचल्याने ऊस पिकाला वेळेवर सिंचन मिळणार असून उत्पादनावरील संभाव्य परिणाम टळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासाही मिळणार आहे.
शिवना नदीतील या पाण्याचा लाभ ऊसासह भाजीपाला, फळबागा आणि इतर बागायती पिकांनाही होणार आहे. नदीकाठच्या विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण परिसरातील जलस्थिती सुधारेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी जायकवाडीच्या बॅकवॉटरचे स्वागत करत भविष्यातही अशाच पद्धतीने नदीत पाणी सोडावे, अशी मागणी केली. शिवना नदीतील पाणी हे या भागातील शेतीचे प्रमुख आधारस्थान असल्याचे त्यांनी सांगितले.