Sambhajinagar News : महायुतीत बंडखोरीचा 'मिठाचा खडा' file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : महायुतीत बंडखोरीचा 'मिठाचा खडा'

विधान परिषदेच्या निवडणुकीत अब्दुल सत्तारांच्या मुलाची उडी; एकनाथ शिंदेंकडून सत्तारांना फोन

पुढारी वृत्तसेवा

Abdul Sattar's Son Enters Legislative Council Election Fray; Eknath Shinde Calls Sattar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा विधान परिषदेची औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट होईल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु भाजपला जागा सुटल्यानंतर महायुतीतील दुसरा घटक पक्ष शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू आहे.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारचा शेवटचा दिवस होता. ही जागा आपल्याच पक्षाला मिळावी यासाठी महायुतीत शिवसेना आणि भाजप हे दोघेही आग्रही होते. रविवारी सायंकाळपर्यंत जागेचा निर्णय झाला नव्हता. त्यामुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांनी अर्ज भरण्याची तयारी करून ठेवली होती.

रविवारी रात्री उशिरा महायुतीत ही जागा भाजपला सुटल्याचे स्पष्ट झाले. भाजपने या मतदारसंघात ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानुसार शिरसाट यांनी सोमवारी दुपारी आपला अर्ज दाखल केला. पण त्याआधीच सकाळी शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली, तसेच युतीचा धर्म पाळण्याचे आवाहन केले आहे.

एकनाथ शिंदे यांचा सत्तारांना फोन

समीर सत्तार यांनी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सत्तार यांना फोन केला. आता सत्तार हे उद्या मंगळवारी मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर सत्तार यांचे चिरंजीव हे निवडणूक रिंगणात राहतात की माघार घेतात हे स्पष्ट होणार आहे.

उमेदवारी अर्जाची आज छाननी

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये महायुतीकडून सुहास शिरसाट, महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेच्या देवयानी डोणगावकर, एमआयएमकडून इसाक खान सांडू खान, अपक्ष म्हणून अब्दुल समीर सत्तार, गणेश लोखंडे, विशाल नांदरकर आणि फारुख हुंडीवाले यांचा समावेश आहे. प्राप्त अर्जाची आता मंगळवारी छाननी केली जाणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही ४ जून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT