Ransom News : साडेसात लाखांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करून डांबून ठेवले File Photo
छत्रपती संभाजीनगर

Ransom News : साडेसात लाखांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करून डांबून ठेवले

काही तासांत आरोपी जेरबंद अपहृत तरुणाची सुखरूप सुटका

पुढारी वृत्तसेवा

A young man was kidnapped and held captive for a ransom of seven and a half lakh rupees

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : साडेसात लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका तरुणाचे अपहरण करून त्याला डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) पोलिसांनी काही तासांतच आरोपींना जेरबंद करत अपहृत तरुणाची सुखरूप सुटका केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व फुलंब्री पोलिसांनी संयुक्तरीत्या केली.

याबाबत सोमठाणा (ता. बदनापूर, जि. जालना) येथील यमुनाबाई रावसाहेब नागवे (५५) यांनी फुलंब्री पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यांचा मोठा मुलगा ज्ञानेश्वर रावसाहेब नागवे (२३) हा गेल्या सात ते आठ महिन्यांपासून पाल फाटा येथे आत्या सुबाबाई वळेकर यांच्याकडे राहत होता. तो अजित सिड्स कंपनीत रोजंदारीवर काम करत होता. मात्र काही दिवसांपासून तो घरी परतला नव्हता.

दरम्यान, फिर्यादी यांचा लहान मुलगा ईश्वर नागवे याला अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन करून ७ लाख ५० हजार रुपये आणा, अन्यथा मुलाच्या जीवाला धोका आहे, अशी धमकी देण्यात येत होती. अपहृत ज्ञानेश्वरही फोनवर संपर्क करून त्यांना पैसे देऊन टाका अन्यथा ते मला मारून टाकतील असे सांगत होता. या घटनेनंतर फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काही तासांतच गुन्हेगार जेरबंद

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व फुलंब्री पोलिसांची तपास पथके तयार करण्यात आली. अपहरणकर्ते सोमठाणा-बदनापूर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दुधना फाटा, बदनापूर येथे संशयास्पदरीत्या उभी असलेली चारचाकी (एमएच-१६ बीए-७८९२) पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांना पाहून ते पळून जाण्याची तयारी करीत असतानाच पोलिसांनी झडप टाकून गणेश राजेश डूलगज (२३) व राजेश करतारसिंग डूलगज (५०, दोघे रा. पैठण) यावंना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता याच वाहनात अपहृत ज्ञानेश्वर नागवेही आढळून आला.

खंडणीसाठी अपहरण

चौकशीत आरोपींनी खंडणीसाठी अपहरण केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन व चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्यासह त्यांच्या पथकाने व फुलंब्री पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT