A Visionary Initiative: Free Distribution of Spectacles to 2,000 Eye Patients
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
: नेत्र रुग्णांपैकी सुमारे ८० ते ८५ टक्के रुग्ण हे आर्थिक अडचणींमुळे विना चष्म्याचे राहतात. हीच अडचण विचारात घेऊन मनोविकारतज्ज्ञ डॉ. मेराज कादरी व मूत्र विकारतज्ज्ञ डॉ आदित्य येळीकर यांनी दृष्टी सेवा अभियानाअंतर्गत गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणीसह चष्मे वाटपचा डोळस उपक्रम रविवारी राबवला. यात तब्बल दोन हजार नेत्र रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले.
एमजीएम येथील रुक्मिणी सभागृह येथे रविवारी आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते व ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. अझीझ अहमद कादरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मेराज कादरी व डॉ. आदित्य येळीकर यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेपासून स्त्री आरोग्य, मधुमेह मुक्त गाव, व सुदृढ बालक स्पर्धा असे स्तुत्य उपक्रम राबवले. दृष्टी सेवा अभियानातून डॉ. ए ए कादरी मानसिक आरोग्य केंद्र, येळीकर्स विद्यासंस्कार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत गरीब व गरजू नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
मंत्री सावे यांनी समाजसेवा ही निस्वार्थ असली पाहिजे. असे सांगत उपक्रमाचे व डॉ. मेराज कादरी यांचे कौतुक केले. तर डॉ. शिवाजी सुक्रे यांनी भविष्यात अशा उपक्रमांना मदतीचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या यशस्-वीतेसाठी मानसिक आरोग्य केंद्राचे डॉ सय्यद जफर, मौहम्मद नजीर, अनस देशमुख, शाहिद कास्मी, अकिब खान व टीम यांनी सहकार्य केले.
दृष्टी दुरुस्त करणे अवघड - डॉ. कादरी
डॉ. अझीझ कादरी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना म्हणाले, चष्मा तुमची नजर स्पष्ट करू शकतो. परंतु दृष्टी दुरुस्त करणे अवघड आहे. यासाठी स्वतः लाच प्रयत्न करावे लागतील. दृष्टी ही स्वतःला निर्माण करावयाची असते. यातून आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे डॉ. कादरी म्हणाले.